वृत्तपत्रामध्ये वृत्तसंपादन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. गेली अनेक वर्षे वृत्तसंपादनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे
दै. 'नवशक्ति'चे संपादक श्री. तुषार नानल यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या या मोलाच्या टिप्स....
...................................
वृत्तपत्राच्या निर्मितीत वृत्त संपादन हा अतिशय
महत्वाचा घटक आहे. बातमीसाठी जे पाच ‘क’ असतात (का, कुणी, केव्हा, कसे आणि
कुठे) त्यांचा समुच्चय असल्याशिवाय कोणतीही बातमी पूर्ण होत नाही. आपल्या
वृत्तपत्राचा वाचक हा सर्वज्ञानी आहे, असा गैरसमज करून घेऊन बातमी लिहिणे
वा प्रसिध्द करणे हे उचित नसते. एखाद्या घटनेचा पुढील परिणाम म्हणून जी
बातमी दिली जाते, ती देताना मूळ घटनेचा धावता उल्लेख आवश्यक तपशिलासह दिला
जातो, तो याचमुळे. बातमीदाराने बातमी तशी दिलेली आहे की नाही हे पाहणे आणि
नसल्यास त्यात आवश्यक ती भर घालणे हे वृत्त संपादन करणार्या व्यक्तीचे
प्रमुख काम आहे. त्याकडे वळण्यापूर्वी वृत्तपत्राच्या कामकाजाचे स्वरूप
कळून घेणे आवश्यक आहे. दिवस उगवल्यापासून रात्री वृत्तपत्र छपाईसाठी
जाईपर्यंतचा काळ हा वृत्तपत्रासाठी महत्वाचा असतो. त्यादृष्टीने
वृत्तपत्रात काही विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.
वृत्तपत्र निर्मितीप्रक्रियेच्या रचनेत जे प्रमुख विभाग असतात ते पुढीलप्रमाणे :
1. संपादकीय
2. प्रॉडक्शन (यात छपाईपूर्व तांत्रिक प्रक्रिया आणि छपाई यांचा समावेश असतो.)
3. जाहिरात
4. वितरण
याखेरीज एखाद्या कार्यालयासाठी आवश्यक असणारे अन्य विभागही वृत्तपत्राच्या कार्यालयात असतात. उदा. व्यवस्थापन, एचआर, अकाऊंट, वगैरे.
संपादकीय विभागाची साधारणत: रचना अशी असते -
1. मुख्य संपादक
2. सहाय्यक संपादक
3. वृत्तसंपादक
4. मुख्य वार्ताहर / मुख्य उपसंपादक
5. वरिष्ठ वार्ताहर / वरिष्ठ उपसंपादक
6. वार्ताहर / उपसंपादक
या रचनेत वृत्तपत्राच्या गरजांनुसार बदल होऊ शकतो. याचाच अर्थ संपादकीय
विभागात बातमीदार आणि उपसंपादक असे दोन विभाग असतात. बातमीदार म्हणजे
कार्यालयाच्या बाहेर विविध ठिकाणी रोज जाऊन तिथून माहिती, तपशील मिळवून
त्याअनुषंगाने बातमी तयार करणारी व्यक्ती. तर उपसंपादक म्हणजे बातमीदाराने
दिलेल्या बातमीवर आवश्यक संपादकीय संस्कार करणारी व्यक्ती. शिवाय
उपसंपादकाला शहराबाहेरील बातम्यांचेही संपादन करावे लागते. ज्या ठिकाणी
आपल्या वृत्तपत्राचा वार्ताहर/प्रतिनिधी नसेल तेथील बातम्या
वृत्तसंस्थेकडून मिळवून घेणे, त्यावर संस्कार करणे, त्याचप्रमाणे देशातील व
देशाबाहेरच्या बातम्या वृत्तसंस्थेकडून इंग्रजीत येतात त्यापैकी आपल्याला
ज्या बातम्या घ्यावयाच्या आहेत त्याचे भाषांतर करणे हे उपसंपादकाचे काम
असते. हे सगळे काम कार्यालयात बसूनच करायवाचे असते त्यामुळे या विभागाला
‘डेस्क’ असेही म्हणतात. याखेरीज रविवार आवृत्ती आणि अन्य पुरवण्यांसाठी
अनेक ठिकाणी स्वतंत्र विभाग असतो.
आपण रोज सकाळी जे वृत्तपत्र वाचतो, त्याची निर्मिती प्रक्रिया ही
आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून सुरू होते. म्हणजे उदाहरण घ्यायचे, तर
मंगळवारी आपण जे वृत्तपत्र वाचतो त्याची तयारी सोमवार सायंकाळपासून सुरू
केली जाते. संपादकीय विभागाच्या दृष्टीने ही तयारी म्हणजे काय? तर
दिवसभरातील घडामोडी, मग त्या आपल्या शहरातील, राज्यातील, देशातील अथवा
परदेशातील असतील, त्यांचा विचार केला जातो. त्यापैकी कोणत्या घडामोडी ह्या
बातम्या आहेत, त्यांचे आकारमान किती असायला हवे, त्यांचे सादरीकरण कसे
असायला हवे या सगळ्या गोष्टी संपादकीय विभागातील ‘डेस्क’ने निश्चित
करायच्या असतात. आज इलेक्ट्रॉनिक मिडीया मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.
त्यामुळे एकंदरच मिडीयात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे पत्रकारितेत
करीअरसाठी येणार्यांनी त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. वाढती स्पर्धा म्हणजे
नोकर्यांच्या भरपूर संधी असा संकुचित अर्थ कुणी घेऊ नये. वृत्तपत्रांसाठी
वाढती स्पर्धा म्हणजे, प्रत्येकावर अधिकाधिक सजग, अचूक, नेमके आणि समाजाला
योग्य दिशा देणारे विचार पोचवण्याची वाढती जबाबदारी, असा अर्थ आहे.
वृत्तपत्र छपाईला जाण्यापूर्वी ते उपसंपादक आणि मुख्य उपसंपादकाकडून
तयार केले जाते. प्रत्येक पानावर कोणत्या बातम्या घ्यायच्या, कशा
घ्यायच्या, किती घ्यायच्या, त्याला सोबत छायाचित्र घ्यायचे का याचा निर्णय
वृत्तसंपादक आणि अन्य वरिष्ठ करतात. मात्र, त्यासाठी वृत्तसंपादकांना
दिवसभरातील घडामोडींविषयी आपल्याकडे असलेल्या मजकुराबाबत पूर्ण माहिती
मुख्य उपसंपादक आणि मुख्य वार्ताहराने द्यावयाची असते. त्यासाठी या
दोघांनाही सगळ्या बातम्यांचा दैनंदिन माग ठेवावा लागतो. वरिष्ठांच्या
बैठकीत ठरल्यानुसार, प्रत्यक्ष अंकात बातम्या घेण्याची जबाबदारी मुख्य
उपसंपादकाची असते. तसेच त्या बातम्यांचे संपादन / भाषांतर उपसंपादकांकडून
करवून घेणे हेही मुख्य उपसंपादकाचे काम आहे. यासाठी त्याला वरिष्ठ
उपसंपादकाने साह्य करणे अपेक्षित असते. म्हणजेच वरिष्ठ उपसंपादकाने मुख्य
उपसंपादक आणि उपसंपादक अशा दोन्ही भूमिकांची जाण ठेवून गरजेनुसार ती ती
भूमिका वठवायची असते.
आज सर्वच क्षेत्रांत तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे. वृत्तपत्र
क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पूर्वीच्या काळी बातम्या कागदावर लिहून त्या
जुळार्याकडे पाठवल्या जात. तो ती बातमी खिळेजुळणी तंत्राने तयार करीत असे.
त्याचे प्रिंट काढून प्रुफरीडिंग केले जाई आणि पूर्णपणे चुका दुरुस्त
केलेल्या बातमीचा खिळे जुळवलेला तुकडा पानाच्या आकारात ठेवला जाई. अशा
रीतीने पान पूर्ण भरले की त्याची प्लेट तयार करून मग ती छपाईला मशीनवर
लावली जात असे. यात कालानुरूप विविध बदल होत गेले आणि आज वृत्तपत्र हे
जवळजवळ पूर्णपणे संगणकावर तयार होऊ लागले आहे. जवळजवळ एवढ्याचसाठी म्हटले
की अजूनही ग्रामीण भागात संगणकीकरण पूर्णांशाने झालेले नाही.
हे सगळे नमूद करण्याचे कारण म्हणजे, या बदलांचा थेट परिणाम हा
उपसंपादकाशी म्हणजेच त्याच्या कामाच्या पध्दतीशी निगडित आहे. या
पार्श्वभूमीवर उपसंपादकाचे काम करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता
आहे, हे जाणून घेऊ या.
भाषाज्या भाषिक वृत्तपत्रात उपसंपादक काम करतो, त्या भाषेचे सखोल
ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मराठी भाषिक वर्तमानपत्रात
डेस्कवर (किंवा रिपोर्टिंगलाही) काम करणार्याला मराठीचे ज्ञान गरजेचे आहे.
मराठी ही आपली मातृभाषा तर आहे, त्यात वेगळे शिकण्यासारखे काय आहे, असा
दृष्टीकोन नसावा. भाषा नीट ठाऊक नसली तर अनेक गोंधळ होऊ शकतात.
वृत्तपत्रातून प्रसिध्द होणारी बातमी एकाचवेळी हजारा/लाखो वाचकांपर्यंत
जाते. हे वाचक विविध थरांतील असतात. त्या सर्वांना ती बातमी नीट समजावी,
यासाठी भाषा नेमकी असणे महत्वाचे आहे. आपल्यालाच जर एखाद्या शब्दाचा नेमका
अर्थ ठाऊक नसेल तर प्रत्येक वाचकाला तो शब्द समजेल हे गृहित धरणे चूक आहे.
त्यामुळे बातमी ही नेहमी साधी, सोप्या भाषेत लिहिलेली, नेमकेपणा असणारी
हवी. अनेकांना भाषेशी खेळण्याची सवय असते. बातमी देताना भाषेशी खेळणे उचित
नाही. कारण तसे करताना बातमीचा आत्मा निसटण्याचा संभव असतो. बातमीचे शीर्षक
देताना क्वचितप्रसंगी भाषेचा खेळ चालू शकतो. भाषेचे ज्ञान नसले तर कोणता
शब्द कुठे हवा हे समजत नाही आणि अर्थाचा अनर्थ घडू शकतो. यासाठी किमान
व्याकरण ठाऊक असायला हवे. त्याचबरोबर शुध्दलेखन येणे हाही उपसंपादकासाठी
महत्त्वाचा घटक आहे. र्हस्व, दीर्घ, आकार, उकार याची माहिती उपसंपादकाला
असलीच पाहीजे. कोणता शब्द कसा लिहितात, हेही उपसंपादकाला माहीत असणे आवश्यक
आहे. उदा. ठाऊक की ठावूक, होऊन की होवून, विशिष्ट की विशिष्ठ, पोलीस की
पोलिस, सरकार की शासन, परीक्षा की परिक्षा, लखनौ की लखनऊ, चौकशी की चवकशी
इ. अर्थात, यासाठी वृत्तपत्रांची आपापली शैलीपुस्तिका असतेच.
याखेरीज उपसंपादकाला इंग्रजी भाषेचेही आवश्यक ज्ञान असले पाहीजे. ते
केवळ कामचलाऊ असून उपयोगाचे नाही. याचा अर्थ इंग्रजी साहित्य असा नाही.
कारण इंग्रजी शब्दांचे अर्थ विविध छटांसह माहिती नसतील तर भाषांतर करताना
चुकीचा अर्थ भाषांतरित होईल. उदा. Jammu police today recovered huge
catche of arms. It contains 25 rifels, 500 magazines, 200 handgreneds
and 48 pistols.
याचे भाषांतर एकाने पुढीलप्रमाणे केले :
जम्मू पोलिसांनी आज मोठा
शस्त्रसाठा जप्त केला. यात 25 रायफली, 500 मासिके, 200 हातबॉंब आणि 50
पिस्तुलांचा समावेश आहे. काडतुसांऐवजी मासिके असे होऊ नये, याची काळजी
उपसंपादकाने घ्यायची असते.
व्याकरणाची किमान माहिती उपसंपादकाला असायला हवी. कर्ता, कर्म,
क्रियापद योग्य प्रकारे बातमीत आहे याची तपासणी उपसंपादकाने करावयाची असते.
वाक्यरचनाही सुविहित करण्याची जबाबदारी उपसंपादकाची असते. उदा. थंडगार
कैरीचे पन्हे असे न लिहिता कैरीचे थंडगार पन्हे असे लिहिणे आवश्यक आहे.
अर्थाचा अनर्थ होऊ नये याची काळजी घेणे हे उपसंपादकाचे काम आहे.
सामान्य ज्ञानउपसंपादकासाठी सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा
घटक आहे. सामान्य ज्ञान म्हणजे स्पर्धात्मक परीक्षांसाठी असते तसे नाही.
‘कोन बनेगा करोडपती’साठी जे सामान्य ज्ञान लागते ते वेगळे. उपसंपादकाला
आपले शहर, राज्य, देश, जगातले किमान महत्त्वाचे असे राजकीय, भौगोलिक,
सांस्कृतिक, क्रीडाविषयक तसेच प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियेचे, साहित्य,
न्याय, राजकारण याबद्दलचे सामान्य ज्ञान असायला हवे. अथे सामान्य ज्ञान
याचा अर्थ किमान माहिती असा आहे. म्हणजे 1352 साली युरोपात कोणता सत्ताधीश
बलवान होता हे ठाऊक नसले तरी हरकत नाही. मात्र, तुम्ही जर मुंबईतील
वर्तमानपत्रात काम करीत असाल तर मुंबईची महानगरपालिका काय करते, तिचे
मुख्यालय कुठे आहे, किती नगरसेवक आहेत, किती वॉर्ड आहेत, महापौर कोणत्या
पक्षाचा आहे, या शहराची राजकीय, सामाजिक, आर्थिक गणिते काय आहेत, इथल्या
रहिवाशांच्या समस्या कोणत्या आहेत वगैरेसारखी माहिती तुम्हाला असलीच
पाहीजे. अशाच प्रकारे आपले राज्य, आपला देश याची माहिती असायला हवी. बातमी
करताना एखाद्या गावाचा वा शहराचा उल्लेख आला तर ते गाव किंवा शहर कोणत्या
राज्यातले आहे हे ठाऊक नसेल तर जाणून घेतले पाहीजे. आपल्या राज्यातील एखादे
गाव कोणत्या जिल्ह्यात येते किंवा राज्याचे प्रशासकीय विभाग कोणते, कोणता
जिल्हा कोणत्या विभागात येतो, इ. बाबी उपसंपादकाला माहीती नसतील तर तो
बातमीत आवश्यक त्या दुरुस्त्या करू शकणार नाही.
याचप्रमाणे उपसंपादकाला पदांची माहिती असली पाहीजे. म्हणजे लष्कर,
नौदल, पोलीस, सरकारी यंत्रणा, तसेच परदेशातील मंत्रिपदे इ. म्हणजे आपल्या
देशात minister of Finance असेल तर अमेरिका-ब्रिटनमध्ये तो Secretary of
Finance असतो. हे ठाऊक नसेल तर भाषांतर करताना आपण अर्थसचिव असे शब्दश: करू
आणि ते चुकीचे असेल.
बातमीची जाणउपसंपादकाकडे एखादी बातमी ज्यावेळी संपादनासाठी किंवा
भाषांतरासाठी येते तेव्हा त्या बातमीचा विषय ठाऊक नसेल तर बातमी असेच तिचे
महत्त्व कळू शकणार नाही. त्यामुळे उपसंपादकाला बातमीची जाण असणे आवश्यक
आहे. त्याचप्रमाणे, बातमीत काय असावे आणि काय नसावे हे त्याला माहीत असणे
संपादनाच्यादृष्टीने गरजेचे असते. बातम्यांचे संंपादन करताना पुढील
गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे - बातमीत बिनचूकपणा आणणे,
शक्यतो अवजड शब्द न वापरणे, प्रत्येक वाचकाला कळेल अशा रीतीने बातमी
लिहिलेली असणे, मूळ बातमी तशी नसेल नर त्या रीतीने पुनर्लेखन करणे, बातमीला
अंतीम रूप देताना शीर्षक-इन्ट्रो-तपशील-शेवट हा क्रम राखणे.
तंत्रज्ञान/लेआऊटनवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या उपसंपादकाला बातम्या
कम्प्युटरवर स्वत: ऑपरेट कराव्या लागतात. त्यामुळे संगणकावर काम करण्याचे
ज्ञान आवश्यक आहे. तसेच वृत्तपत्राची पानेही आता संगणकावरच तयार होत
असल्यामुळे पान कसे लावायचे याचेही ज्ञान उपसंपादकाला असले पाहीजे. (या
दोन्ही बाबी वार्ताहरांनादेखील आता आवश्यक होत आहेत.) संगणकावर पान
लावण्यासाठी अगदी किमान तांत्रिक माहिती आवश्यक असते. आपल्याकडे, पान
लावण्यासाठी तीनपैकी एका सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. ही सॉफ्टवेअर्स
पुढीलप्रमाणे आहेत - 1) पेजमेकर 2) क्वार्क एक्सप्रेस आणि 3) इन डिझाइन.
यापैकी पेजमेकरचा वापर हा प्रामुख्याने मासिके, नियतकालिक यांच्यासाठी केला
जातो. पूर्ण आकाराच्या म्हणजे ब्रॉडशिट वृत्तपत्रासाठी इतर दोन
सॉफ्टवेअरचा वापर होतो. ही सॉफ्टवेअर वापरणे अवघड नाही.
साधारणपणे आठपंधरा दिवसांचा सराव त्यासाठी पुरेसा असतो. ही
सॉफ्टवेअर्स वापरतानाच उपसंपादकाने पानाच्या रचनेबाबत म्हणजेच लेआऊटबाबत
लक्ष दिले पाहीजे. आपल्याकडे असलेली बातमी अधिकाधिक वाचनीय केल्यानंतर
आपल्याकडील पानही अधिकाधिक प्रेक्षणीय करता आले पाहीजे. त्यासाठी
बातम्यांची मांडणी, बातमीसंदर्भातील छायाचित्र वा अन्य व्हिज्युअलचा वापर
करू केलेली सजावट, चौकटी, रंगांचा वापर, आकर्षक आणि विविध फॉंटसचा
शीषर्कासाठी वापर आदी गोष्टी लेआऊट करताना उपयुक्त ठरतात.
उदा. दोन कॉलम आकाराच्या बातम्या शक्यतो शेजारी शेजारी लावू नये. त्यात
मध्ये शक्य असल्यास छायाचित्र वा सिंगल कॉलम बातमी लावावी. जागेअभावी अथवा
अन्य काही कारणाने अशा प्रकारे बातम्या शेजारी शेजारी लावणे भाग पडत असेल
तर दोन्ही बातम्यांच्या शीषर्काचे फॉंट ठळकपणे वेगळे दिसतील, असे वापरावे.
पानाचे लेआऊट करताना साधारणत: मुख्य बातमी (लीड), छायाचित्र आणि तळातील
बातमी (अँकर) यांचा समतोल साधला पाहीजे.
उपसंपादक कसा हवा?- तो चांगला वाचक हवा. कारण अधिकाधिक विषयांवरचे वाचन कामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.
- सभोवताली घडणार्या घटनांचे त्याला भान असायला हवे. कारण या घडामोडी किंवा त्यांचे परिणामच बातमीरूपाने उपसंपादकासमोर येत असतात.
- बातमीसाठी आवश्यक संदर्भ ठाऊक असले पाहीजेत. त्यासाठी सामान्य ज्ञान सतत अपडेट करायला हवे.
- प्रादेशिक, सांस्कृतिक, राजकीय वैशिष्ट्ये ठाऊक असावीत.
- त्याला एकाचवेळी समूहमन आणि विशिष्ट समाजघटकांच्या भावना यांचे भान बातमी संपादित करताना ठेवता आले पाहीजे.
- उपसंपादकाकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोन असला पाहीजे.
- बातमी कशी
विकसित होईल तसेच तिचे सर्वसमान्यांवर काय परिणाम होऊ शकतील, याची जाणीव
उपसंपादकाला असली पाहीजे. त्यामुळे बातमीचे महत्व त्याला कळू शकते.
- वृत्तपत्रनिर्मिती ही सामूहिक प्रक्रिया आहे. कोणाही एका माणसाचे ते काम नाही, याची जाणीव हवी.
- वृत्तपत्र निर्मितीत वेळ किंवा वशरवश्रळपश याला अत्यंत महत्व असते. राज
सकाळी वाचकापर्यंत आपले वृत्तपत्र वेळेत जाण्यासाठी ही निर्मिती प्रक्रिया
वेळेतच होणे आवश्यक असते. ही वेळ सांभाळण्याची जबाबदारी डेस्कवर असते.
-
बातम्या संपादित करताना वाचक हा केंद्रबिंदू मानला पाहीजे. तसेच बातम्या
पूर्वग्रहावर आधारित असणार नाहीत, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
- सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वृत्तपत्रात काम करताना वेगवेगळ्या
शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यादृष्टीने प्रकृतीची काळजी सदोदित घेणे
आवश्यक आहे. भरपूर तास, न अकता विशेषत: रात्री काम करण्याची शारीरिक तसेच
मानसिक क्षमता आणि तयारी हवी.
- तुषार नानल