Monday, 2 May 2016

आई आणि मी

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशा शब्दांत कवी यशवंत यांनी सांगितलेली आईची महती अगदी खरी आहे. याची प्रचिती आपल्याला जाणत्या वयात येते. 
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशा शब्दांत कवी यशवंत यांनी सांगितलेली आईची महती अगदी खरी आहे. याची प्रचिती आपल्याला जाणत्या वयात येते. आपण कितीही मोठे झालो तरीदेखील आपल्या आयुष्यात आपली आई नसेल तर त्या आईविना जगण्याला अर्थच राहत नाही.
कारण या जगात आपल्याला आणणारी आपली ही माऊलीच असते. जिला आपण आई म्हणतो, असं म्हणतात की, प्रत्येक वेळी आपल्याबरोबर देव राहू शकत नाही, म्हणून त्याने ‘आई’ ही व्यक्ती निर्माण केली आहे, जी अगदी जन्मापासून आपल्याबरोबर पावलोपावली असते. माझं आणि माझ्या आईचंदेखील अगदी असंच आहे. मी तिला विसरणं शक्यच नाही.
तिच्या उल्लेखाशिवाय माझी ओळख पूर्ण नाही, अशा माझ्या आईचं आणि माझं नातं आई आणि मुलीपेक्षाही अधिक म्हणजे मैत्रीचं आहे. ती माझी आईच नाही तर माझी खास मैत्रीण आहे. मी माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट मी माझ्या आईबरोबर शेअर करते.
अगदी लहान लहान गोष्टी तिला सांगितल्याशिवाय मला चैनच पडत नाही, तसंच तीदेखील मला घरातील प्रत्येक गोष्ट सांगत असते. म्हणूनच की काय मला कोणी भावंड नसल्याचं कधीच दु:ख झालं नाही, कारण माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलणारी माझी आई सतत माझ्याबरोबर आहे.
तसं बघायला गेलं तर मी जन्माला येतानाच तिला त्रास देत आले आहे. माझ्या जन्माच्या वेळेला आईला खूप त्रास झाला होता, त्यातून तिच सिझरिंग करावं लागलं. त्यासाठी तिच्या मणक्यात इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळे अगदी माझ्या जन्मापासून तिला मणक्याचं दुखणं सुरू झालं. तरी देखील तिने माझं संगोपन अगदी उत्तम प्रकारे केलं.
जसजशी मी मोठी होत गेली, तसतसे तिचे कष्टदेखील वाढत गेले. अगदी माझ्या प्लेग्रुपपासून ते दहावीपर्यंत आम्ही राहायला करी रोडला होतो आणि ती मला कडेवर घेऊन दादरला प्लेग्रुपला घेऊन जायची. अशा प्रकारे आईच्या या कष्टामुळे माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली.
प्लेग्रुपचं शिक्षण झालं, मग शाळेत जायची वेळ आली. आईची फार इच्छा होती की मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकावं व अगदी इतर मुलांसारखं फाडफाड इंग्रजी बोलावं. मात्र तसं होणे थोडं कठीण होते, कारण आम्ही राहायला करी रोडला असल्यामुळे मी राहात असलेल्या ठिकाणी कॉन्व्हेंट शाळाच नव्हती. पण इंग्रजी शाळेत शिकायचं तर मला प्रभादेवी कॉन्व्हेंट शाळेत अ‍ॅडमिशन धेणं गरजेचं होतं.
माझ्या आईने तिची जिद्द सोडली नाही आणि तिच्या कष्टामुळे व इच्छेमुळेच मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली आणि आज माझं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमधून झालं. या माझ्या सगळ्या शैक्षणिक प्रवासात माझ्या आईने खूप मेहनत घेतली आहे आणि या सगळ्या कष्टामुळे तिला संधीवाताचा त्रास सुरू झाला.
आज मी मोठी झाले तरी मी माझ्या आईसाठी लहानच राहणार आहे. आजही ती रोज सकाळी माझ्या ऑफिसचा डबा भरण्यापासून सगळी कामं स्वत:च करते. ऑफिसमधून थकून आल्यावर मला भूक लागली असेल म्हणून संध्याकाळचा नाश्तादेखील ती बनवून ठेवते.
मला आठवतंय मी लहान असताना मला कावीळ झाली होती. तेव्हा मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तेव्हा माझी हालत खूप खराब झाली होती. पण माझ्या आईने माझ्यासाठी भरपूर कष्ट केले. ती रात्रंदिवस एकटी माझी सेवा करत होती. आणि तिने माझ्या खाण्या-पिण्याची काळजी घेतल्यामुळेच मी जगू शकले.
कॉलेजमध्ये सगळ्या जणी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतात, कोणी काय घातलं होतं, कोणते प्रोफेसर काय म्हणाले, कोणी प्रपोज केलं.. या सगळ्या गोष्टी मी माझ्या आईबरोबरच शेअर करत होते. तिनेही ते एका मैत्रिणीप्रमाणेच नेहमी ऐकलं. काय चांगलं आणि काय वाइट याची समज दिली. त्यामुळे कोणी मैत्रीण नसल्याची कधी मला खंतच वाटली नाही.
अशी माझी आई इतकं सगळं करूनदेखील तिचे हे कष्ट थांबलेले नाहीत, कारण आता तिच्या मनात माझ्या लग्नाविषयी काळजी आहे आणि यासाठी तिला इतका संधीवाताचा त्रास असूनदेखील ती आठवडयातून दोन फे-या न चुकता आमच्या समाजाच्या विवाह मंडळात मारते. आणि माझ्यासाठी स्थळं आणते. अशा या माझ्या आईची मेहनत सांगताना शब्द अपुरे पडतात. तिचे उपकार फेडणं मला याच काय पण सात जन्मातसुद्धा शक्य नाही.
                                                                                                                                                                                                                                                                  

No comments:

Post a Comment