रिल आणि रिअल लाईफमधला फरक सर्वांनाच कळतो असं नाही. पडद्यावर साकरत असलेलं पात्र आणि वास्तविक जीवनातील आपलं वर्तन यातील फरक ओळखण्यासाठी आत्मपरिक्षण करावं लागतं. प्रत्युषा आणि तिच्यासारख्या इतर मॉडेलने केलेल्या आत्महत्या पाहाता, ही कलाकार मंडळी हे आत्मपरिक्षण करतात का? याबाबत शंका निर्माण होते.
बालिका वधू या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र 'आनंदी'... बालविवाह सारख्या रूढी-परंपरांचा एक बळी... मात्र मोठेपणी तिच्या नव-याला हा बालविवाह मान्य नसतो... तो दुसरं लग्न करतो... अशा अनेक संकटांना धीर-गंभीर आणि त्यागी वृत्तीने तोंड देतं 'आनंदी' आपलं जिवन अधिक सुंदर आणि समाजाला आदर्शवत ठरेल अशा रितीने जगत असते. मात्र ही भूमिका साकारणा-या प्रत्युषाचं काय?
प्रत्युषा 'आनंदी'च्या भूमिकेत |
कलाकाराला पडद्यावर साकारत असलेल्या भूमिकेत एकरूप व्हावं लागतं. 'रामायण' या मालिकेतील श्री रामाची भूमिका साकारणा-या अरूण गोविल यांचं हे एक उत्तम उदाहरण. मालिकाच्या शेवटी त्यांची एक मुलाखत बघायला मिळाली. ज्या दिवसापासून मी श्री रामाची भूमिका साकारायला लागलो त्या दिवसापासून मी सिगारेट आणि दारू पिण्याचे सोडले आहे, असं अरूण गोविल यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले होते. आपण साकारत असलेल्या भूमिकेशी तादात्म्य झाल्याशिवाय हे शक्य नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटते. पडद्यावरील आपण साकारत असलेल्या भूमिकांमधून जर आपले जीवन सुखकर होत असेल तर अशा आदर्श भूमिकांचा अंगीकार करण्यास वाईट ते काय.
प्रत्युषा 'आनंदी' होती का?
पडद्यावर 'आनंदी' साकारणारी प्रत्युषा वास्तविक जीवनात खरंच आनंदी होती का? हा प्रश्न आता सर्वांनाच पडतोय. असं काय घडलं, ज्यामुळे प्रत्युषाने आत्महत्या केली. शोषिक, त्यागी आणि संकटांना आनंदाने सामोरी जाणारी 'आनंदी' प्रत्युषाला कळलीच नाही का? करिअर, पैसा आणि या झगमगत्या दुनियेत आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्युषाने 'आनंदी'चा मार्ग अवलंबला असता तर तिला आत्महत्या करण्याची वेळ आली असती का?
या मायानगरीची तिली एवढी भूरळ पडली की वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच तिने मुंबई गाठलं. आई-वडिलांना सोडून ती एका तरूणाबरोबर राहत होती. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणे... या संबंधांची आतापर्यंतची उदाहरणं पाहिलीत तर आपल्याला या तथाकथित 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा अर्थ कळेलं. आर्थिक आणि शारिरीक गरजा पूर्ण करण्यासाठीच बहुदा अशा संबंधांचा उपयोग ही मंडळी करत असावीत. कारण मानसिकदृष्ट्या एकत्र राहणे म्हणजे आपापसातील मनं जुळणे, मनं जुळलीत की माणूस त्याला काहीतरी नातं देण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या दोघांच्या मनाच्या एकरूपतेवर अवलंबून असतं. पणं तस आढळत नाही. इंद्राणी आणि तिचा पहिला मित्र यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेली शीना बोरा. नंतर इंद्राणीने तीन लग्न केलीत. याचा अर्थ सरळ आहे. अनैतिक संबंधांना नात्याच नाव देवून ते अधिकृत करण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्याने करत असतात.
प्रेम की आकर्षण?
एखाद्या मालिकेत काम मिळालं की त्या कलाकाराला लगेचच सेलिब्रिटिचं प्रमाणपत्र मिळतं. किंवा इतर प्रसिद्धी माध्यमं त्याला सेलिब्रिटी बनवितात. असाच एक, कधीही नाव न एकलेला, राहुल राज. प्रत्युषाचा मित्र. प्रत्युषाने आत्महत्या केली नाही. तिचा खुन झालाय, असं तिच्या मित्र परिवाराचं म्हणणं आहे. तपासांती जरी काही बाबी स्पष्ट होणार असल्या तरीही सध्या तपासादरम्यान ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या धक्कादायकच आहेत. राहुल विवाहित असल्याच समजतंय. राहुल-प्रत्युषा एकत्र राहात होते. प्रत्युषाला तो विवाहित असल्याचे माहित होते का? राहुल प्रत्युषाला नशा करायला लावायचा, प्रत्युषाला मारहाण करायचा, त्याच्या गर्लफ्रेंडला घरी आणायचा, त्याची गर्लफ्रेंडही प्रत्युषाला मारहाण करायची, असे अनेक खुलासे त्याच्या काही मित्र परिवाराने मी़डियासमोर केलेत. यात किती तथ्य आहे हे तपास पुर्ण झाल्यावरच कळेल.
प्रत्युषाला राहुलशी लग्न करायचं होतं. पण जर राहुल प्रत्युषाशी गैरवर्तन करत होता आणि त्याच्या गर्लफ्रेंडलाही नेहमी घरी आणायचा तर अशा राहुलशी लग्न का करावं, असा प्रश्न प्रत्युषाला स्वाभाविकच पडायला हवा होता. पण तसा विचार प्रत्युषाने का केला नाही. ती कोणत्या आकर्षणाचा बळी पडत होती. कोणत्याही मुलीला आपला होणारा पती आदर्शवत असावा असचं वाटतं. किंबहुना सुखी जीवनासाठी तसचं वाटायला हवं.
प्रत्युषा गरोदर असल्याचही म्हटलं जातय. याची सिद्धता जरी अजून व्हायची असली तरी पात्रता नसलेल्यासोबत संसार करण्याचा हट्ट आपलीही पात्रता सिद्ध करत असते. बापाच्या पैशांवर मजा मारणारे, दिवस-रात्र नशा करणारे हे व्यसनी, कोणाशीही एकनिष्ठता न ठेवता अनेक गर्लफ्रेंड्सला फिरवणा-या अशा कामांध व्यक्तिसोबत (लग्न झालेल्या व्यक्तिसोबत) आपण आपल्या संसाराची स्वप्न बघणे, म्हणजे समाजापुढे आपली वैचारीक पातळी सिद्ध करणे नव्हे का?
प्रत्युषाने आत्महत्या केली. पण जणू 'आनंदीने'च आत्महत्या केल्याचा भास तिच्या चाहत्यांना होवू लागला. कारण प्रत्युषामध्ये ते 'आनंदी'ला बघत होते. पण प्रत्युषाने हा प्रयत्न केला असता तर तिच्यावर ही वेळ आली नसती. कारण प्रेम कोणावर कराव, हे कळलं पाहिजे. बळजबरी आणि आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम हे त्यागातच असतं, या भूमिकेतून जर प्रत्युषा संसारात वावरली असती तर तिला आत्महत्या करायची वेळ आली नसती आणि वास्तविक जीवनातही ती 'आनंदी' राहिली असती.
ऩरेंद्र बयाणी
No comments:
Post a Comment