Sunday, 24 April 2016

प्रत्युषा खरंच 'आनंदी' होती का?

रिल आणि रिअल लाईफमधला फरक सर्वांनाच कळतो असं नाही. पडद्यावर साकरत असलेलं पात्र आणि वास्तविक जीवनातील आपलं वर्तन यातील फरक ओळखण्यासाठी आत्मपरिक्षण करावं लागतं. प्रत्युषा आणि तिच्यासारख्या इतर मॉडेलने केलेल्या आत्महत्या पाहाता, ही कलाकार मंडळी हे आत्मपरिक्षण करतात का? याबाबत शंका निर्माण होते.

पडद्यावरील 'आनंदी'
बालिका वधू या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र 'आनंदी'... बालविवाह सारख्या रूढी-परंपरांचा एक बळी... मात्र मोठेपणी तिच्या नव-याला हा बालविवाह मान्य नसतो...  तो दुसरं लग्न करतो... अशा अनेक संकटांना धीर-गंभीर आणि त्यागी वृत्तीने तोंड देतं 'आनंदी' आपलं जिवन अधिक सुंदर आणि समाजाला आदर्शवत ठरेल अशा रितीने जगत असते. मात्र ही भूमिका साकारणा-या प्रत्युषाचं काय?

प्रत्युषा 'आनंदी'च्या भूमिकेत

कलाकाराला पडद्यावर साकारत असलेल्या भूमिकेत एकरूप व्हावं लागतं. 'रामायण' या मालिकेतील श्री रामाची भूमिका साकारणा-या अरूण गोविल यांचं हे एक उत्तम उदाहरण. मालिकाच्या शेवटी त्यांची एक मुलाखत बघायला मिळाली. ज्या दिवसापासून मी श्री रामाची भूमिका साकारायला लागलो त्या दिवसापासून मी सिगारेट आणि दारू पिण्याचे सोडले आहे, असं अरूण गोविल यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले होते. आपण साकारत असलेल्या भूमिकेशी तादात्म्य झाल्याशिवाय हे शक्य नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटते. पडद्यावरील आपण साकारत असलेल्या भूमिकांमधून जर आपले जीवन सुखकर होत असेल तर अशा आदर्श भूमिकांचा अंगीकार करण्यास वाईट ते काय. 

प्रत्युषा 'आनंदी' होती का?
पडद्यावर 'आनंदी' साकारणारी प्रत्युषा वास्तविक जीवनात खरंच आनंदी होती का? हा प्रश्न आता सर्वांनाच पडतोय. असं काय घडलं, ज्यामुळे प्रत्युषाने आत्महत्या केली. शोषिक, त्यागी आणि संकटांना आनंदाने सामोरी जाणारी 'आनंदी' प्रत्युषाला कळलीच नाही का? करिअर, पैसा आणि या झगमगत्या दुनियेत आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्युषाने 'आनंदी'चा मार्ग अवलंबला असता तर तिला आत्महत्या करण्याची वेळ आली असती का?


या मायानगरीची तिली एवढी भूरळ पडली की वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच तिने मुंबई गाठलं. आई-वडिलांना सोडून ती एका तरूणाबरोबर राहत होती. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणे... या संबंधांची आतापर्यंतची उदाहरणं पाहिलीत तर आपल्याला या तथाकथित 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा अर्थ कळेलं. आर्थिक आणि शारिरीक गरजा पूर्ण करण्यासाठीच बहुदा अशा संबंधांचा उपयोग ही मंडळी करत असावीत. कारण मानसिकदृष्ट्या एकत्र राहणे म्हणजे आपापसातील मनं जुळणे, मनं जुळलीत की माणूस त्याला काहीतरी नातं देण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या दोघांच्या मनाच्या एकरूपतेवर अवलंबून असतं. पणं तस आढळत नाही. इंद्राणी आणि तिचा पहिला मित्र यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेली शीना बोरा. नंतर इंद्राणीने तीन लग्न केलीत. याचा अर्थ सरळ आहे. अनैतिक संबंधांना नात्याच नाव देवून ते अधिकृत करण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्याने करत असतात.

प्रेम की आकर्षण?
एखाद्या मालिकेत काम मिळालं की त्या कलाकाराला लगेचच सेलिब्रिटिचं प्रमाणपत्र मिळतं. किंवा इतर प्रसिद्धी माध्यमं त्याला सेलिब्रिटी बनवितात. असाच एक, कधीही नाव न एकलेला, राहुल राज. प्रत्युषाचा मित्र. प्रत्युषाने आत्महत्या केली नाही. तिचा खुन झालाय, असं तिच्या मित्र परिवाराचं म्हणणं आहे. तपासांती जरी काही बाबी स्पष्ट होणार असल्या तरीही सध्या तपासादरम्यान ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या धक्कादायकच आहेत. राहुल विवाहित असल्याच समजतंय. राहुल-प्रत्युषा एकत्र राहात होते. प्रत्युषाला तो विवाहित असल्याचे माहित होते का? राहुल प्रत्युषाला नशा करायला लावायचा, प्रत्युषाला मारहाण करायचा, त्याच्या गर्लफ्रेंडला घरी आणायचा, त्याची गर्लफ्रेंडही प्रत्युषाला मारहाण करायची,  असे अनेक खुलासे त्याच्या काही मित्र परिवाराने मी़डियासमोर केलेत. यात किती तथ्य आहे हे तपास पुर्ण झाल्यावरच कळेल.

प्रत्युषाला राहुलशी लग्न करायचं होतं. पण जर राहुल प्रत्युषाशी गैरवर्तन करत होता आणि त्याच्या गर्लफ्रेंडलाही नेहमी घरी आणायचा तर अशा राहुलशी लग्न का करावं, असा प्रश्न प्रत्युषाला स्वाभाविकच पडायला हवा होता. पण तसा विचार प्रत्युषाने का केला नाही. ती कोणत्या आकर्षणाचा बळी पडत होती. कोणत्याही मुलीला आपला होणारा पती आदर्शवत असावा असचं वाटतं. किंबहुना सुखी जीवनासाठी तसचं वाटायला हवं.


प्रत्युषा गरोदर असल्याचही म्हटलं जातय. याची सिद्धता जरी अजून व्हायची असली तरी पात्रता नसलेल्यासोबत संसार करण्याचा हट्ट आपलीही पात्रता सिद्ध करत असते. बापाच्या पैशांवर मजा मारणारे, दिवस-रात्र नशा करणारे हे व्यसनी, कोणाशीही एकनिष्ठता न ठेवता अनेक गर्लफ्रेंड्सला फिरवणा-या अशा कामांध व्यक्तिसोबत (लग्न झालेल्या व्यक्तिसोबत) आपण आपल्या संसाराची स्वप्न बघणे, म्हणजे समाजापुढे आपली वैचारीक पातळी सिद्ध करणे नव्हे का?


प्रत्युषाने आत्महत्या केली. पण जणू 'आनंदीने'च आत्महत्या केल्याचा भास तिच्या चाहत्यांना होवू लागला. कारण प्रत्युषामध्ये ते 'आनंदी'ला बघत होते. पण प्रत्युषाने हा प्रयत्न केला असता तर तिच्यावर ही वेळ आली नसती. कारण प्रेम कोणावर कराव, हे कळलं पाहिजे. बळजबरी आणि आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम हे त्यागातच असतं, या भूमिकेतून जर प्रत्युषा संसारात वावरली असती तर तिला आत्महत्या करायची वेळ आली नसती आणि वास्तविक जीवनातही ती 'आनंदी' राहिली असती. 

                                                                                                       ऩरेंद्र बयाणी

कलात्मक सॉकेट

एक सुंदर घर आजकाल प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. नवीन घर विकत घेतलं की मात्र त्या नवीन घराची सजावट करणं म्हणजे कौशल्याचं काम असतं आणि त्यातून जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर मात्र कोणती गोष्ट कुठे आणि कधी सजावट हा पालकांना पडलेला मोठा प्रश्न असतो.
http://prahaar.in/wp-content/uploads/2015/02/Switch.jpg
म्हणजे घर सजवताना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण लहान मुलं कधीच कोणत्या जागी स्थिर बसत नाही. कुठे एखादी गोष्ट लपवून ठेवली असेल तर तीच गोष्ट पाहण्याची त्यांना उत्सुकता असते. म्हणूनच घरात लहान मूल असेल तर घराची सजावट करताना घरातील काचेच्या वस्तूंची जागा, काही विजेची उपकरणं, औषधं आदी गोष्टींची व्यवस्था चोख ठेवावी लागते.
अशीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर आऊटलेट्स. ही जागा लहान मुलांपासून कशी लांब ठेवता येईल याची काळजी घेणं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात याची जागा कुठे असावी यावर चांगले शोध लावले आणि त्यानुसार काही अशा डिझाईन तयार केल्या, ज्यामुळे तुमची इलेक्ट्रिक पावर इनव्हिजिबल दिसेल. थोडक्यात हा कन्सिलचा प्रकार असला तरी त्यात दिसायला आकर्षक असे विविध पर्याय आहेत, ते कोणते आहेत हे जाणून घेऊया.
एक म्हणजे तुमच्या भिंतीवर केवळ लोंबकळणारे मणी दिसतील. एका खाली एक असे चार, तीन, दोन असे मणी असतील. त्यांच्या संख्येवरून तुम्हाला पंखा, दिवा, टीव्हीचं बटण कोणतं हे ओळखता येईल. वर केवळ मणीच दिसल्याने ते सुंदर दिसतात.
सॉकेट आत राहील अशी एक लाकडी, खिडकीप्रमाणे दिसणारी चौकट करावी. आपल्याकडे स्लायडिंग दरवाजे असतात त्याप्रमाणे त्या एक छोटासा दरवाजा असेल. त्या दरवाजावर छोटंसं डिझाईन असतं. त्याच्या आता सॉकेट असेल. हवा तेव्हा या स्लायडिंगचा दरवाजा उघडता येतो. हा दरवाजा बंद केला की जणू काही एखादी लाकडी फ्रेमच लावली आहे, असंच दिसेल.
काही जण इस्त्री किंवा अन्य काही कामासाठी जमिनीजवळ सॉकेट करून घेतात. असं सॉकेट म्हणजे भीतिदायक असतं. वर सांगितल्याप्रामणे लाकडी फ्रेमची डिझाईन नको असेल तर तुम्ही त्याला छोटंसं दार करू शकता. दार केलं की त्याला कुलूपही लावता येतं. म्हणजे ते उघडण्याची भीतीच नाही.
आपला जो मुख्य स्वीच बोर्ड असतो, त्याचा आकार मोठा असतो. त्याची दररोज काही गरज भासत नाही. त्यामुळे तो लपवला गेला तरीही चालतो. त्यामुळे त्यावर एखादं दार करून किंवा त्यावर एखादी फोटोफ्रेम लावली तरीही कोणाला आतमध्ये स्वीच बोर्ड आहे याची पुसटशीदेखील कल्पना येणार नाही.
डायनिंग टेबलावर किंवा अभ्यासाच्या वाचायच्या टेबलाला पायावर खाच तयार करून आतमध्ये हे सॉकेट करावं. त्यावर तुम्हाला दारही करता येतं. हवं त्या वेळी तुम्ही ते उघड-बंद करून त्याचा वापर करू शकता. आणि कोणाला कळणारही नाही.

काही काही ठिकाणी क्लॅप म्हणजे टाळीवरदेखील तुम्ही दिव्यांच्या खेळ खेळू शकता. म्हणजे टाळी वाजवली की दिवे डीम होऊ शकतात.
इतकंच नाही तर एसीच्या रिमोटप्रमाणे एकाच रिमोटवर तुम्ही सगळी बटणं लावून एकाच रिमोटवरूनही दिवे बंद किंवा लावू शकतात.
काही जणांना वाचनासाठी बेडजवळ सॉकेट करायची सवय असते. अशा सॉकेटमध्ये बेडवर पडल्या पडल्या अगदी आरामात लहान मुलं बोटं घालू शकतात. किंवा त्याच्याशी खेळू शकतात. मात्र तुमचं बजेट जास्त नसेल तर हल्ली बाजारात कित्येक प्लास्टिकच्या वस्तू मिळतात, ज्या तुम्ही त्या सॉकेटमध्ये घालून ठेवू शकतात.
                                                                                                    
                                                                                                                                प्रिता झगडे

Tuesday, 19 April 2016

पाणीदार जाम

बाजारात दिसणाऱ्या फिकट पोपटी रंगांच्या जामचं शास्त्रीय नाव सेनेन्जिअम समरेंजेस असं आहे. या फळाचं झाड बारा मीटर उंच वाढत असून ते उष्णप्रदेशीय भागात अधिक प्रमाणात आढळतं.
jaamबाजारात दिसणाऱ्या फिकट पोपटी रंगांच्या जामचं शास्त्रीय नाव सेनेन्जिअम समरेंजेस असं आहे. या फळाचं झाड बारा मीटर उंच वाढत असून ते उष्णप्रदेशीय भागात अधिक प्रमाणात आढळतं.
अंदमान आणि निकोबार बेटावर हे प्रामुख्याने आढळतं. या फळाच्या फुलांना चारच पाकळ्या आणि असंख्या पुंकेसर असतात. या फळाचा रंग पांढरा, हिरवा किंवा फिकट गुलाबीही असून त्याची साल चकचकींत असते. त्याच्या चकचकीतपणामुळे आणि आकारामुळे हे फळ वॅक अ‍ॅपल किंवा बेल अ‍ॅपल या नावानेही ओळखलं जातं.
यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. तसंच चवीला ते थोडंफार हिरव्या सफरचंदासारखं लागतं. या फळात जीवनसत्त्व सी, फायबर, प्रथिनं, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते.
»  जीवनसत्त्व ‘अ’चं प्रमाण यात अधिक असतं. याच्या सेवनामुळे पांढऱ्या रक्तपेशी वाढण्याला मदत होते.
»  दिवसभर कॉम्प्युरटवर काम केल्याने डोळे थकतात, जळजळ होते, कधी कधी त्यातून पाणीही येतं. असा त्रास नियमित होत असलेल्यांनी या फळाचं नियमित सेवन करावं.
»  लहान मुलांना ताप येत असेल तर याच्या फुलांचा लेप लावावा, आराम पडतो.
»  पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. म्हणजे घामावाटे बाहेर पडणाऱ्या पाण्याची झीज भरून काढायला मदत होते.
»  अतिसार किंवा डायरिया आदी विकारांवरही हे फळ अतिशय उत्तम आहे.
»  उष्णतेमुळे तोंड आल्यावर त्यावर आपण या फळाचं सेवन केल्यास लवकर आराम मिळतो.
»  वीर्यवृद्धीसाठीदेखील उपयुक्त आहे.
                                                                                                            

Thursday, 7 April 2016

तुम्हीच बनवा तुमची वेबसाइट अगदी फ्री...

होय! हे शक्य आहे... 
'वेबसाइट बिल्डर्स'च्या माध्यमातून तुम्ही विनामुल्य वेबसाइट बनवू शकता. गेली अनेक वर्षे 'वेबसाइट बिल्डर्स' फ्री वेबसाइटची सेवा पुरवित आहेत. जर तुम्हाला स्वत:चं किेंवा तुमच्या व्यवसायाचं ऑनलाईन मार्केटींग करायचं असेल तर त्यासाठी 'वेबसाइट बिल्डर्स' हा एक उत्तम पर्याय सध्या उपलब्ध आहे. 



इंटरनेमुळे व्यापार क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आलेत. व्यवसायाचा आवाखा वाढविण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे. पण त्यासाठी तुमचा व्यवसाय ऑनलाई असणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्या व्यवसायासाठी, इतर उपलब्ध पर्यायांच्या तुलनेत, ऑनलाईन मार्केटींग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यालाच वेब मार्केटींग असेही संबोधले जाते. पण वेब मार्केटींगसाठी वेबसाइट आवश्यक असते. फक्त वेबसाइटच्या माध्यमातूनच वेब मार्केटींग होत, असं नाही. पण स्वत:ची वेबसाइट हे तुमचं हक्काचं व्यासपीठं असतं.  


वेबसाइट ही अनेकांसाठी अजूनही एक क्लिष्ट प्रक्रीया आहे. वेबसाइट बनवणं म्हणजे खर्चिक काम, असं अनेकांचं मतं आहे. काही अंशी ते योग्यही आहे. पण आता 'वेबसाइट बिल्डर्स'चा पर्याय उपलब्ध असल्यामुळे, वेबसाईटबाबत भीतीचं काही कारणं नाही. 'वेबसाइट बिल्डर्स' म्हणजे अशा वेबसाइट्स ज्या तुम्हाला फ्री वेबसाईट बनविण्यासाठी लागणा-या सर्व प्रणाली ऑनलाईन पुरवितात. पूर्वीचा ओबडधोबड वेबसाइट्सचा जमाना गेला. आता 'वेबसाइट बिल्डर्स' तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या डिझाइनचा समावेश असलेले टेम्प्लेट्स पुरवितात. या टेम्प्लेट्सच्या माध्यमातून एक सुंदर-सुबक अशी विनामुल्य वेबसाइट तुम्ही बनवू शकता.


websitebuildertop10.com च्या सर्वेक्षणानूसार 2016 मधील टॉप टेन 'वेबसाइट बिल्डर्स'...

www.sitebuilder.com                         98%

www.websitebuilder.com                  95%

www.sitey.com                                   91%

www.ehost.com                                  90%

www.sitelio.com                                 85%

http://www.webs.com/                       80%

www.siteblog.com                             79%

www.godaddy.com                            78%

http://www.squarespace.com/          77%

http://www.1and1.com/                     76%


(नरेंद्र बयाणी)

Tuesday, 5 April 2016

पारंपरिक बैठकीची सजावट


   http://prahaar.in/wp-content/uploads/2014/03/hall.jpg लिमॉडर्न जगतात सगळं काही मॉडर्न पद्धतीने सजवण्याचं फॅड आलं आहे. चमच्यापासून ते बेडरूमपर्यंत सगळं काही मॉडर्न हवं असतं. लिव्हिंग रूममध्ये बसण्यासाठी सोफा कम बेड असावा. तसंच जेवताना डायनिंग टेबलच पाहिजे. पण या सोफा कम बेड आणि डायनिंग टेबलची जागा हल्ली बैठय़ा सोफा सेटने घेतली आहे. बाहेर कितीही पद्धतशीर वागलो तरी घरात आल्यावर जरा आपल्याला जसं आवडतं तसंच आपण बसतो. आरामदायी व आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणा-या काही जुन्या पद्धती लोकं पुन्हा अवलंबत आहेत. त्यातच खाली बसण्याची जुनी पद्धत पुन्हा प्रचलित झाली आहे.
व्हिंग रूम म्हणजेच बैठकीची खोली. पाहुणचाराची सुरुवात या खोलीपासूनच होते. म्हणून या खोलीचं विशेष महत्त्व आहे. थकूनभागून घरात आल्यावर बसण्यासाठी आसान हे आरामदायक असावं. तसंच घरात आल्यावर आपल्याला शांत आणि प्रसन्न वाटायला हवं, अशा पद्धतीने घराची मांडणी असावी. आजकाल सोफा कम बेड वर जाऊन बसायचं म्हटलं की अगदी शिस्तीत आणि सरळ बसावं लागत. त्याऐवजी पारंपरिक बैठक असली तर मस्त मोकळेपणाने बसण्याची मुभा मिळते. ही पूर्वीची बैठक म्हणजे मस्त जमिनीवर बसणं. सोफा कम बेडमुळे या पद्धतीचा विसर पडलाय. पण कधी तरी लहर आली की आपण खालीच बसतो. ‘खाली बसल्यावर जरा बरं वाटतं’ असं सहज बोलून जातो. पण हे खरंच आहे, खाली बसल्यावर आपण पाय मोकळे ठेवू शकतो. तसंच बसण्यावर आणि बसल्यावर कसलंच बंधन नसतं. जमिनीवर निवांत बसू शकतो. यासाठीच काही जण जुन्या पद्धती अवलंबू लागले आहेत. इंटिरिअर डेकोरेटर्सनी यात चांगलीच शक्कल लढवून लिव्हिंग रूममध्ये बैठय़ा भारतीय पद्धतीची मांडणी करतात. त्यात ही ‘मॉडर्न टच’कसा मिळेल याची काळजी घेतली जाते. ही मांडणी सोफ्यासारखीच असते. त्यात तुम्हाला बरेच रंग उपलब्ध होतील. ही बैठी पद्धत खिडकीच्या जवळ असेल तर आणखीनच छान. तसं केल्यास बाहेरील रस्त्यावरील दृश्य तुम्हाला आरामशीर पाहता येईल. पडद्याचा रंग आणि उश्यांचा रंग तुमच्या आवडीनं निवडू शकता. तसेच या बैठय़ा सोफा सेटमध्ये गडद रंग आहेत, त्यामुळे घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि आल्हाददायक वाटतं.




बैठय़ा सोफा सेटमुळे कंबरेला आणि हातापायांनाही त्रास होत नाही. लिव्हिंग रूममध्ये असलेला हा बैठा सोफा सेट तुम्हाला जिथं ठेवायचा असेल तिथं तुम्ही ठेवू शकता. तसंच साफसफाई करताना तो हलवणंही सोपं जातं. घराचं नूतनीकरण केलं असेल तर त्याची जागा तुम्ही बदलू शकता. ही बैठी पद्धत आरामदायक तर असतेच त्याशिवाय सोयीनुसार ते हलवता ही येतात. तसंच या बैठय़ा सोफा सेटमध्ये तुम्हाला बरेच रंगही मिळतील. यासाठी इंटिरिअर डेकोरेटर्सचं मार्गदर्शन घेऊ शकता. इंटिरिअर डेकोरेटर्सचा सल्ला तुम्हाला घ्यायचा नसेल किंवा तुम्हाला तुमचं घर तुमच्या आवडी-निवडीनेच सजवायचं असेल तर तेही शक्य आहे. बाजारात गेल्यावर दुकानदाराला तुमच्या आवडीचं डिझाइन आणि रंग सांगून तुम्हाला जसा पाहिजे तसं सोफा सेट बनवून घेऊ शकता. जास्त खर्च करायचा नसेल तर हे कमी खर्चातही शक्य आहे. नुसती तुमच्या आवडीची चटई जमिनीवर टाकून त्यावर गादी किंवा बिछाना टाकायचा. तुम्हाला आवडेल त्या रंगाची चादर त्यावर टाका. चादरीचा रंग शक्यतो गडद असला तर जास्त उठून दिसेल. पाठी टेकून बसण्यासाठी तुम्ही कुशनचा वापर करू शकता. बाजारात कुशनच्या खूप चांगल्या डिझाइन्स आणि पॅटर्न उपलब्ध आहेत. त्या गादीवर ठेवू शकता.
लिव्हिंग रूमच्या बैठय़ा पद्धतीप्रमाणे डायनिंग टेबलचेही प्रकार बदलले आहेत. पूर्वी, खाली बसून जेवण्याची पद्धत होती. खाली बसून जेवल्याने गरजेइतकंच जेवण खाल्लं जातं, तसंच पोटाचे विकारही होत नाहीत असं म्हणतात. म्हणूनच, पूर्वी जमिनीवर बसून मांडी घालून जेवण्याची रीत प्रचलित होती. काही जणांना डायनिंग टेबलशिवाय जमतच नाही. असं असलं तरी पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू झाली आहे. यात ही मॉडर्न टच दिला जातो. अगदी खाली ताट न ठेवता ते योग्य उंचीच्या टेबलावर ठेवण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. आपल्याला ताट ठेवून व्यवस्थित जेवता येईल इतक्या उंचीवर ते टेबल असतं. मॉडर्न टच म्हणून त्या टेबलाच्या ब-याच डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. उत्कृष्ट कलाकुसर केलेले हे टेबल्स बाजारात दिसतात. लाकडाच्या आणि स्टीलच्या टेबलांची चलती जास्त आहे. तसंच त्याच्या किमतीही तुमच्या खिशाला परवडण्याजोग्या असतात. आधुनिक फर्निचर्स आणि पद्धती कितीही प्रचलित झाल्या तरी जुनं तेच सोनं असतं यात काही शंकाच नाही. या जुन्या पण नव्या मॉडर्न टचने बनलेली बैठी टेबल्स तुम्हाला नक्की आवडतील. मॉडर्न लुक असला तरी ती भारतीयच   आहेत.

                                                                                                                              (  प्रिता झगडे )



.