Saturday, 25 January 2014

विवेकाचा जागर....

श्रद्धेचा जेव्हा अतिरेक होतो,तेव्हा अंधश्रद्धेचा जन्म होतो.जवळ जवळ 18 वर्षे रखडलेल्या जादूटोणविरेधी कायद्याचा वटहुकूम एका दिवसात जारी केला आणि त्यावर राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी शिक्कामोर्तब केलं.त्यामुळे आता जादूटोणा,अघोरी प्रथा यांचा अवलंब करणाऱ्यांना आणि अशा कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना किमान सहा महीने ते सात वर्षांचा तुरुंगवास,तसंच पाच हजार ते 50 हडार रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
       या कायद्याविरोधात असणाऱ्या सनातनी शक्तिंनी जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी समाजात गैरसमज पसरवलेत.काही राजकारण्यांनीही वस्तुस्थिती समजून न घेता आपलं राजकारण चालवलं.या सगळ्यातून प्रबोधनाऎवजी अज्ञानाचा गोंधळच उडाला.यामुळेच आता हा कायदा सर्वसामान्यांना समजावून सांगणं,वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं,प्रबोधन करणं आवश्यक आहे.या कायद्यात एकूण 12 कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
      आपण 12 कलमं समजून घेऊः-
कलम 1.भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तिला दोराने किंवा साखळीने बांधून मारहाण                                                                           करणं,मिरचीची धुरी देणं,तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणं,त्या व्यक्तिला उघड्यावर    लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणं,त्याचा विविध प्रकारे छळ करणं,मूत्रविष्ठा खायला लावणं अशी कृत्य गुन्हा ठरतील.   
कलम 2.एखाद्या व्यक्तिने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणं आणि अशा तथाकथित चमात्कारांचा प्रसार व प्रचार करून लोकांना फसवणं,ठकवणं,त्यांच्यावर दहशत बसवणं त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणं गुन्हा ठरेल.
कलम 3.अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतुने,ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात,अशा अमानुष,अनिष्ट,अघोरी प्रथांचा अवलंब करणं आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणं,उत्तेजन देणं किंवा सक्ती करणं हा गुन्हा आहे.   
कलम 4.मौल्यवान वस्तु,गुप्तधन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने,जारणमारण,करणी,भानामती या नावाने अमानुष,अनिष्ट आणि अघोरी कृत्य आणि जादूटोणा करमं आणि यांच्या नावाने नरबळी देणं किंवा देण्याचा प्रयत्न करणं किंवा अशी अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणं हा गुन्हा.     
कलम 5.आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती अथवा एखाद्या व्यक्तित अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भिती निर्माण करणं आणि त्या व्यक्तिचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणं,फसवणं,ठकवमं हा गुन्हा असेल.केवळ अंगात येणं हा गुन्हा नाही.
कलम 6.एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते,जादूटोणा करते,भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते असं सांगुन त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणं,अपशकुनी अहे,सैतान आहे असं जाहीर करणं.अशा व्यक्तीचे जगणं मुश्किल करणं,त्रासदायक करणं हा गुन्हा.   
कलम 7.जारणमारण,करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली व्यक्तिला मारहाण करणं,नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारावर बंदी घालणं हा गुन्हा.   
कलम  8.मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करेन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणं,एखाद्या व्यक्तीला शरीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणं,घबराट निर्माण करणं,मृत्युची भिती घालणं हा गुन्हा.   
कलम 9.कुत्रा,साप आणि विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी तिला अमानुष,अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणं किंवा मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणं हा गुन्हा.   
कलम 10.बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणं किंवा गर्भवती महिलांच्या गर्भाचं लिंग बदलून दाखवतो असा दावा करणं हा गुन्हा.   
कलम 11.स्वतःला अलौकिक शक्ती असल्याचं वा आपण अवतार असल्याचं भासवून नादी लागलेल्या व्यक्तीस तू माझी गेल्या जन्मीची पत्नी,प्रेयसी वा प्रियकर होता असं सांगून लैंगिक संबंध ठेवणं.तसंच मुल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तिद्वारे मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा.       
कलम 12.एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तिमध्ये अलौकिक शक्ती असल्याचं भासवणं,त्याद्वारे त्या व्यक्तिचा वापर धंदा,व्यवसायासाठी करणं हा गुन्हा.
      मंबई मराठी पत्रकार संघात आमचे लेक्चर घेण्यासाठी आलेले पुरूषोत्तम आवरे पाटील सरांनी आम्हाला या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली आणि समजावून सांगितले.
      या कायद्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळावर जा.
                 www.abans.com


No comments:

Post a Comment