श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे ही
अवघ्या मराठी मनांची शान ! खरे तर शिवरायांचे कर्तृत्व
महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नाही. ते खूप खूप मोठे होते आणि असा गुणवंत, शीलवंत, श्रीमंत योगी जिने घडविला ती माता
जिजाऊ त्यांच्याहूनही महान होती. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा | ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ||’ असे म्हणतात; पण अशा कीर्तिमान पुत्राला
वाढविताना जी मेहनत मातेला घ्यावी लागते त्याला तोड नाही. जिजामातेने शिवाजीराजे
घडविले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नीतिमत्तेची झळाळी त्यांच्या मातेच्या
शिकवणुकीतूनच प्राप्त झाली. जाधवांची ही कन्या शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर विवाह
करून भोसले घराण्याची सून झाली. पण सासर-माहेरात काही कारणाने वितुष्ट आले आणि
जिजाऊला ते दु:ख सहन होण्यासारखे नव्हते. अशा वेळी शिवाजी यांच्यावर तिने लक्ष
केंद्रित केले.
“अशी असावी माता, जिचा वाटावा अभिमान
पुत्र घडविला समर्थ ऐसा, जो राष्ट्राची शान
देशप्रीतीचे धडे गिरविले, तिजपाशी बसुनी
धन्य जिजाऊ, धन्य जिजाऊ नमन तिला लवुनी”
असे जिच्याबद्दल अतिशय मनापासून
म्हणावेसे वाटते ती जिजामाता. मराठयांनी आपापसात युध्द करू नये, आपल्याच दौलतीची धूळधाण करू नये, असे तिला फार मनापासून वाटे.
आपल्यावर मोगलांनी हुकुमत गाजवावी या गोष्टीने तिचा संताप होई. म्हणून तर शिवबाला
घडविताना तिने एक निर्भय, कुशल, सर्वांना आपलेसे करून घेणारा आणि
ही सत्ता, हे राज्य माझे नाही..ते तर श्रींचे आहे इतकी अलिप्त आणि
संन्यस्तवृत्ती धारण करणारा नेता घडविण्यासाठी सारे कौशल्य पणाला लावले.
ती म्हणे, “शिवबा, येथे अनंत अत्याचार होत आहेत.
गरिबांचा कोणी वाली उरलेला नाही. जाळपोळ लुटालूट, अत्याचार करीत सुटलेल्यांना जाब
विचारण्याची हिंमत कोणात उरली नाही. बायाबापडयांना सुरक्षित जीवनाची कोणतीही हमी
उरलेली नाही. तू त्यांचा रक्षणकर्ता हो. कर्ता, त्राता, उध्दारकर्ता हो. शीलवंत पुरूषाचे
मूर्तिमंत उदाहरण माझा शिवबा होईल तेव्हाच माझ्या डोळ्यांचे पारणे फिटेल. या
प्रदेशातील माणसे साधी भोळी असली, तरी जिवाला जीव देणारी आहेत.
त्यांना आपले म्हण, आपला बंधू, सखा तेच आहेत. त्यांच्या मदतीनेच ‘स्वराज्य’ स्थापण्याचे स्वप्न उराशी बाळग.
आपल्या लोकांना गुलामीच्या जोखडातून मुक्त कर शिवबा. तुजवर भवानीआईची कृपा आहे.
माझे आशीर्वाद तुझी सदैव पाठराखण करतील.” अशा प्रकारे आपल्या पुत्राला
उत्तेजित करून तिने पराक्रमास सिध्द केले. युध्दास आवश्यक असलेले असे सर्व
प्रकारचे प्रशिक्षण त्याला दिले आणि मोठया विश्वासाने मराठयांचा हा सुपुत्र तिने
रयतेला बहाल केला. जिजाऊ स्वत: अतिशय कर्तृत्ववान होती.
धर्मकार्यपरायण होती. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. अन्याय, जुलूमशाही, अराजक याबाबत तिच्या मनात
आत्यंतिक चीड होती. ती अतिशय नि:पक्षपाती होती. थोडासुध्दा
अंधविश्वास तिच्या ठायी नव्हता.
शहाजीराजे तिचे पती. सन १६६४ मध्ये ते मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे ती सती जायला निघाली, पण शिवरायांनी तिला सती जाण्यापासून मोठया मिनतवारीने परावृत्त केले. आपल्या पुत्राचा राज्याभिषेक व्हावा, अशी तिची फार इच्छा होती. ईश्वरकृपेने आणि शिवरायांच्या कर्तृत्वाने इच्छापूर्ती झाली. हा राज्याभिषेकाचा सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला. रायगडावरील या सोहळ्यानंतर तृप्त मनाने ती पाचाड येथे पोहोचली. कारण एकच तिला रायगडावरील हवा सोसत नव्हती. ती पाचाड येथे जाऊन राहिली आणि राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी तिला मरण आले. अशी माता होणे खरंतर प्रत्येक मुलीचं स्वप्न असलं पाहिजे. तरच आपण बलशाली, सामर्थ्यशाली, वैभवसंपन्न भारताचे समर्थ स्वप्न सत्यात उतरवू शकू.

No comments:
Post a Comment