सा-या जगात १९८९ हे वर्ष छायाचित्रणाचे एकशे पन्नासावे वर्ष म्हणून साजरे केले गेले. या काळात आम्ही जन्माला आलो हे एकपरीने आमचे भाग्यच समजायला हवे. कारण यामुळे घरबसल्या बाहेरचे सारे जग आपण छायाचित्ररूपात पाहू शकलो. आज इतिहासाचे पानन पान छायाचित्रणाने लिहिले जात आहे. महासागराच्या तळाशी असलेला अमौलिक खजिना टिपला जात आहे तो छायाचित्रणाने. अंतराळातल्या मोहविणा-या ता-यांचा वेध घेतला जात आहे तो छायाचित्रणाने. जमिनीच्या गर्भात काय काय दडलेले आहे याचा शोध घेतला जात आहे तोही छायाचित्रणाने. पृथ्वीतलावर घडणा-या असंख्य जिवंत घडामोडींना चिरस्थायी करण्याचे, मौलिक काम छायाचित्रणाने केले आहे.
कॅमेरा कुठल्या
छायाचित्रात कशा त-हेने वापरता येतो ही दिशा कळणे आवश्यक आहे. कॅमेरा हे एक यंत्र
आहे, पण तो कसा वापरावा हे एक तंत्र आहे. तांत्रिकतेत प्रत्यक्ष कॅमेरा वापरताना
चुका होणं स्वाभाविक आहे. मात्र ती चुक कशी झाली हे त्याला कळणे आवश्यक आहे. यंत्र
आणि तंत्र या दोन्ही गोष्टी छायाचित्रकाराने नीट अभ्यासल्या तर त्याला यशस्वी
छायाचित्रणाचा मंत्र मिळेल. त्यावेळी मात्र त्याचा शिक्षक तोच असेल व कलाचित्रे,
कलातपस्वी त्याचे मार्गदर्शक असतील. छायाचित्रणाचा छंदच असा आहे की कुठल्याही
प्रसंगाविषयीचा किंवा दृश्याविषयीच्या आपल्या भावना छायाचित्राद्वारे बोलक्या करता
येतात आणि ज्या भावना बोलक्या होतात त्या छायाचित्राच्या रुपाने चिर:काल टिकतात.
फोटोग्राफी ही
जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वावरत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज फोटोग्राफीची
गरज आहे. केवळ हौस म्हणूनच नव्हे तर ती एक काळाची निकड झाल्याचे दिसत आहे. दृक
आविष्काराचे कॅमेरा हे एक प्रभावी साधन आहे. छायाचित्र- पत्रकारितेत तर म्हटले जाते की एक
छायाचित्र दहा हजार शब्द बोलू शकते.
कॅमेरा
स्वत: आपले कार्य करीत नाही तर त्या पाठीमागील कुशलता, कल्पकता व बुद्धीमता
आपले कार्य करते. चांगल्या छायाचित्रणाकरिता शास्त्रशुद्ध अभ्यासाबरोबरच कुशल
कल्पकता व मेहनतीची आवश्यकता असते. चांगले चित्र काढावयास जसे शिकावे लागते, तसेच
चांगले चित्र बघावयास दृष्टीही तयार करावी लागते. आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून
छायाचित्रणाचा गौरव केला जातो. ही भाषा सर्व थरांच्या लोकांना कळते म्हणूनच या
माध्यमातून जगात सर्व ठिकाणी पोहोचता येते. छायाचित्रणाला अनेक अंगे असलेला छंद
असे म्हटले गेले आहे. पूर्ण व्यवसाय म्हणून किंवा पूर्ण छंद म्हणून किंवा
अर्धव्यवसाय म्हणून फोटोग्राफीचा उपयोग केला जाऊ शकतो. स्वत:च्या
नेहमीच्या नोकरीबरोबरच अर्धव्यवसाय म्हणून किंवा हौस म्हणून हा छंद जोपासता येतो.
No comments:
Post a Comment