Friday, 1 May 2015

मित्रांच्या सहवासात...


आयुष्यरूपी वेलीवर उमलणारी सुंदर फुले म्हणजे मित्र. शीतल चंद्राच्या छायेत चांदण्या रात्री पडलेलं गोड स्वप्न म्हणजे मित्र. आयुष्यात सुखाचा सुगंध पसरविणारे आणि दु:खाची दुर्गंधी दूर करणारे म्हणजे मित्र. प्रसंगी फुलांहूनही कोमल आणि वज्राहूनही कठीण होणारे म्हणजे मित्र. सुखाच्या छायेत आणि दु:खाच्या वाटेत आयुष्याच्या नावेला किनारा दाखविणारे म्हणजे मित्र. मनाला निर्भिड बनविणारं, नवीन आव्हान पेलायला लावणारं, मनात जिद्द निर्माण करणारं एक अखंड, अभेद्य स्फुर्तिस्थान म्हणजे मित्र.
या आणि अशा अनेक संकल्पना मित्रांच्या बाबतीत करता येऊ शकतात. पण जो सुखाबरोबरच दु:खातही साथ देतो तोच खरा मित्र. मैत्री म्हणजे केवळ सहवास किंवा नुसता परिचय नव्हे. तर मैत्री हे एक अतूट असं बंधन आहे. ज्या बंधनाला ना वयाची सीमा असते ना परिस्थितीची अट. आपण आई-वडीलांशी जितकं समरस होऊन बोलू शकत नाही तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. मैत्री ही आपणास मिळणारी अशी भेट आहे जी देवाने दिलेल्या रक्ताच्या देणगीपेक्षा श्रेष्ठ असते. मैत्रीतही बरेच प्रकार असतात. जसे काहीतरी हेतू ठेऊन केलेली मैत्री, समोर आहे म्हणून झालेली मैत्री आणि भावनिकरीत्या आपणहून नकळत झालेली मैत्री. नकळत झालेली मैत्री असते तिच खरी मैत्री होय. प्रत्येक नात्याला एक संकल्पना एक विशिष्ट साचा असतो. तसा मैत्रीला नसतो. मैत्रीची व्याप्तीच एवढी मोठी आहे की, तिला तोलनं किंवा मोजणं शक्यच नाही.
मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे. याला शब्दात बांधणं कठीण आहे. खरंच ज्या नात्याला उगम नाही, ज्याचा जन्मच नाही ते नातं इतकं दृढ का होतं? अशी कोणती शक्ती आहे, जिच्यामुळे या नात्याची गुंफण घट्ट गुंफली गेलीय? मैत्रीत एकटेपणा घालवण्याची, आनंदी ठेवण्याची क्षमता खूपच संस्मरणीय वाटते. आपल्या मित्रापासून दूर गेल्यानंतर आपण आपल्या मित्राला सतत आठवतो, त्याची उणीव क्षणाक्षणाला जाणवायला लागते, तेव्हा आपल्याला आपोआप आपल्या मैत्रीतली दृढता समजते व जेव्हा ती समजते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मित्र म्हणून मिरवण्यास पात्र ठरतो. जसे चांगले मित्र आपल्या आयुष्याला आकार देतात, वळण लावतात तसे वाईट मित्रच आपल्या आयुष्याला आकारहीन, निस्तेज बनवितात. म्हणूनच आपण अचूक मित्र निवडले पाहिजेत. जेणेकरून, आपले कर्तृत्व झळाळून निघेल.
आयुष्य म्हणजे सुंदर सुखचित्र
त्यात रंग भरणारे खरे मित्र' 

No comments:

Post a Comment