Friday, 1 May 2015

मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार...


आपल्याला माहित आहे की, डिप्रेशन हा जगभर आढळणारा एक अत्यंत सर्वसाधारण आणि नेहमीचा मानसिक आजार आहे आणि तो सर्व समाजांमध्ये आढळून येतो. असे असले तरीही सर्वसाधारण आरोग्यसेवेत त्याच्यावर उपचार मिळणे तर दूरच, पण फार क्वचित त्याचे निदान केले जाते. याचे कारण साधे आहे. डिप्रेशनचे फार कमी रूग्ण त्यांना डिप्रेशनचा त्रास होत आहे याची उघडपणे तक्रार करताना आढळतात. अनेक अ-युरोपीय भाषांमध्ये डिप्रेशन किंवा अँग्झायटी या मानसिक रोगांसाठी शब्ददेखील नाहीत. अर्थात सर्वांना प्रश्न पडतो की हे मानसिक आजार ओळखायचे कसे आणि त्यावर उपचार करायचे कसे? आपण या लेखात मानसिक आजारांबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 
उत्तम आरोग्य म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त शरीर असे नाही. उत्तम आरोग्य म्हणजे मनही निरोगी असले पाहिजे. चांगले मानसिक आरोग्य असलेली व्यक्ती सरळ आणि व्यवस्थित विचार करू शकली पाहिजे. आयुष्य जगताना विविध समस्यांना तोंड देऊ शकली पाहिजे. मित्रपरिवाराबरोबर, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर आणि कुटुंबियांबरोबर चांगले संबंध राखू शकली पाहिजे. तसेच स्वत: समाधानी राहून स्वत:च्या वागण्याने ती इतरांना आनंद देऊ शकली पाहिजे. 
तसे पाहता शरीर आणि मन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे समजून आपण बोलत असतो. प्रत्यक्षात त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यांत अनेक गोष्टी समान आहेत. फक्त जगासाठी ते दोन स्वतंत्र चेहरे आहेत. दोहोंपैकी एकाला जर त्रास होत असला तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. शरीर आणि मनाचा आपण जरी स्वतंत्रपणे विचार करत असलो तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र मुळीच नाहीत.
जसे आपले शरीर आजरी पडू शकते तसेच आपले मनही आजारी पडू शकते. याला आपणमानसिक आजार म्हणू शकतो. मानसिक आजाराची थोडक्यात व्याख्या काय? मानसिक आजार म्हणजे असा कुठलाही आजार ज्यामुळे त्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि वर्तनावर परिणाम होतो. संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाच्या आणि सांस्कृतिक धारणांच्या बाहेर जाणारे हे वर्तन असते. शिवाय त्या वर्तनाचा त्या व्यक्तीच्या किंवा तिच्या कुटुंबाच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.
मानसिक आजारांमध्ये आरोग्याच्या व्यापक समस्यांचा समावेश होतो. बहुतेकांना वाटते की, मानसिक आजार म्हणजे हिंसक, प्रक्षुब्ध वर्तन आणि लैंगिक संबंधासाठी अयोग्य असणे. या प्रकारच्या वर्तन समस्या तीव्र प्रकारच्या मानसिक बिघाडांमध्ये आढळून येतात. पण मानसिक आजार झालेले बहुसंख्य सर्वसाधारण लोकांसारखेच दिसतात आणि वागतात. नेहमी आढळणाऱ्या मानसिक आजारांमध्ये डिप्रेशन, चिंता, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता यांचा समावेश होतो.

No comments:

Post a Comment