बाजारात
ग्राहकाचे स्थान महत्वाचे समजले जाते. बाजारात होणारे कोणत्याही वस्तुचे
उत्पादन हे विक्रीसाठीच असते. खरेतर तिची विक्री हि ग्राहकांच्या मर्जीवर
अवलंबून असायला हवी. कारण जर वस्तुंची विक्रीच झाली नाही तर बाजार चालेल
तरी कसा. वस्तुच्या विक्रीवर बाजाराचे अस्तित्व अवलंबून असते. म्हणुनच या
बाजारात ग्राहकाला राजा असे संबोधले जाते. या बाजाराचे काही साधे व सोपे
नियम आहेत. त्यातील महत्वाचा नियम म्हणजे जर एखादी वस्तू ग्राहकाला आवडली
नाही तर तिचे उत्पादन ताबोडतोब थांबविले गेले पाहिजे. ग्राहकाला जो माल
पाहिजे आहे तोच माल उत्पादकाने तयार केला पाहिजे.
बाजार खरेतर या पध्दतीने चालला पाहिजे. पण वास्तवात परिस्थीती नेमकी उलटी
आहे. बाजारात ग्राहकाची सर्रास लुट चालली आहे. त्याल्या हातोहात फसविले जात
आहे. मालात भेसळ केली जाते. मालाची किंमत जास्त लावली जाते. कमी
गुणवत्तेचा माल दिला जातो. एकदा का मालाची विक्री झाली कि नंतर त्याबाबत
कोणतीही तक्रार स्विकारली जात नाही. विक्री नंतरच्या सेवा दिल्या जात
नाहित. या फसवणुकीमध्ये जाहिरातींचा सिंहाचा वाटा असतो. मोठ्या प्रमाणावरील
विविध प्रकारच्या जाहिरातींमूळे ग्राहकाला आपल्याला हव्या असलेल्या
वस्तुंपेक्षा उत्पादक उत्पादन करील त्याच वस्तू खरेदी कराव्या लागतात.
मोठमोठ्या स्टार्सना जाहिरातबाजीसाठी करोडो रुपये दिले जातात आणी त्यांच्या
मार्फत निकृष्ट दर्जाची उत्पादने ग्राहकांच्या गळी उतरवली जातात. जाहिरात
करणा-यांनी पैशापायी नैतिकता गहाण ठेवलेली असते. त्यामुळे वस्तू निकृष्ट
दर्जाची आहे हे माहित असुनही केवळ पैशाच्या लालसेपायी जाहिराती केल्या
जातात. त्याचा बळी ठरतो तो हा ग्राहक राजा. राजा राजा म्हणुन त्याला उंच
झाडावर चढवले जाते आणी मग ते झाडच मुळासकट कापले जाते. जोपर्यंत त्याला
अक्कल येते तोपर्यत खुप उशिर झालेला असतो. तो अनेक प्रकारे फसविला गेलेला
असतो. त्याला कोणीही दाद देत नाही. कारण तो गरिब असतो. तो विखुरलेला असतो.
असंघटित असतो. त्याला आपल्या हक्कांची जाणिव नसते. आणी हक्कांची जाणिव असली
तरी व्यापारी व कारखानदारांशी भांडुन आपले ह्क्क प्रस्थापित करण्यास ब-याच
वेळा तो असमर्थ असतो किंवा त्याला वेळ नसतो. ग्राहकांच्या या विवशतेचा
फायदा व्यापारी, उत्पादक व कारखानदार घेतात. कारण हा वर्ग श्रीमंत असतो,
संघटित असतो. त्यांना माहित असते कि ग्राहक हा नुसता नावाचा राजा आहे. तो
आपले काहिही वाकडे करु शकत नाही. त्यामुळे त्यांचा भर हा ग्राहकाला सेवा
देण्यापेक्षा त्याला लुटण्यावरच अधिक असतो. औद्योगिक क्रांती होण्यापुर्वी
उत्पादन छोट्या प्रमाणावर होत असे. वस्तुचे स्वरुपही साधे असे. पण औद्योगिक
क्रांतीनंतर विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन
व्हायला लागले आहे. वस्तुचे स्वरुपही तांत्रीक व गुंतागुंतीचे झाले आहे.
कायद्याचे नियम वस्तू खरेदी करणा-यांनीच ती खरादी करण्यापूर्वी तपासून
पहावी असे होते. आजची परिस्थीती बदलली आहे. सामान्य ग्राहकाला वस्तू तपासून
पहाणे शक्य नाही. त्यामुळे वस्तू विकणा-यावरच ती जबाबदारी टाकणे आवश्यक
झाले आहे. उत्पादक व व्यापारी यांना संबधीत वस्तुंचे ज्ञान असते. त्यांनी
ग्राहकांचे हित लक्षात घेउन वस्तुचा दर्जा चांगला राहिल , त्यापासून
ग्राहकाला कोणताही धोका राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणुन
अशावेळी सरकारची भुमिका महत्वाची ठरते. सरकारने यासाठी कायदे तर बनवले
आहेत. गरज आहे ती त्यांच्या योग्य अंमलबजावणीची. या दृष्टीने सरकारी
प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. सरकारकडून कायद्याची योग्य अंमलबजावणी
झाल्यास उत्पादक व व्यापारी यांच्यावर अंकूश राहिल. आणी उत्पादक व व्यापारी
यांनी केवळ नैतिक मुल्यांचे पालन केल्यास ग्राहक समाधानी होईल. आणी त्याच
दिवशी ग्राहक ख-या अर्थाने राजा म्हणवला जाईल.
No comments:
Post a Comment