Thursday, 30 April 2015

नको ती महागाई

     आजपर्यंत या विश्वात कुठल्याच गोष्टीला अमरत्व प्राप्त झाले नाही. म्हणजे माणसाला    नाही. पशु-पक्ष्यांना नाही. वा-याला नाही. पण महागाई मात्र  या सगळ्याला अपवाद ठरवण्याच्या  मार्गावर आहे. कारण महागाई जेव्हापासुन जन्माला आली आहे. तेव्हापासुन फक्त वाढतेय, फोफावतेय. आपल्या आजुबाजुला महागाईने आपली पाळेमुळे अगदी घट्ट रोवली आहेत. त्यासाठी तिला मदत करणारे आपलेच राजकारणी लोक आहेत. त्या मुळे ती स्थिरावली आहे. सुस्तावली आहे. तिने इथेच आपला डेरा टाकला आहे. या महागाईच्या जन्मापुर्वीची कहाणी खुप वेगळी होती. पुर्वी रूपायाला पाच शेर तांदुळ मिळायचे. दुध, तुप, दही यांची रेलचेल असायची. सोन पंधरा-वीस रूपये तोळ होत. वीस-पंचवीस रूपयात, सात-आठ जणांचा संसार व्यवस्थित चालायचा, या सगळ्या गोष्टी आता दंतकथा वाटायला लागल्या आहेत. आजच्या पिढीला एकच सत्य माहीत आहे, ते म्हणजे महागाई. या महागाईचे सगळ्यात जास्त चटके गरीब माणसाला सोसावे लागतात. या महागाई मुळे गरीब श्रीमंत यांमध्ये दरी निर्माण झाली आहे.

     रोजच्या जीवनात चैनीच्या वस्तू महाग झाल्या तर त्या टाळता येऊ शकतात. परंतु जीवनावश्यक गोष्टीसुद्दा महाग झाल्या आहेत. आज भारत शेतीमध्ये खुप पुढे गेला आहे. तरीही भारतातल्या प्रत्येक माणसाला दोन वेळचे जेवण का नाही मिळत? मग काय उपयोग देश स्वातंत्र होउन. आजच्या जगात एक गोष्ट उरली नाही जी महाग नाही. भाजीपाला महाग झाल्याने गरीबांनी काय खावे? हा प्रश्न त्यांना पडलाय. या सगळ्याचा परिणाम म्हणुन झोपडपट्टया वाढू लागल्या. गरीबांच खाण वडापाव तो सुद्धा महाग झाला. हया सगळ्या परिस्थीतीत सामान्य माणसाचे जगणे अशक्य होत चालले आहे. रोगांची साथ आली की तिला पायबंद घालण्याचे अनेक उपाय असतात. परंतु  महागाईला आळा घाळण्यासाठी मात्र  ठोस उपाय केले जात नाहीत. सामान्य माणसाचं  सगळच आयुष्य या महागाईशी झगडण्यात निघुन जाते. आणि शेवटी तिच्या विळख्यात अडकुन त्याचा बळी जातो.  

     भारत सरकारने कुठलेही कार्यक्रम आखण्यापुर्वी महागाई निर्मुलनाची मोहीम हाती घेतली पाहिजे. महागाईवर नियत्रंण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. महाग करावयाचे असल्यास अमली पदार्थ  महाग करावेत जेणे करून त्याचे देशातुन उच्चाटन होईल. नाहीतर हे असेच सुरू राहील आणि एक वेळ अशी येईल की पैसा ही मुल्यमापन करणारी गोष्ट संपुष्टात आणुन पुन्हा देवाण-घेवाण पद्धत रूजू करण्यासाठी बंड  पुकारला जाईल. कारण सामान्य माणुस या महागाई समोर जास्त काळ टिकाव धरू शकेल याची शक्यता कमी  आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी घेतलेली बरी. नाहीतर लवकरच आपल्याला  "महाघाईने शेवटच्या सामान्य  माणसाचाही बळी घेतला, त्यामुळे सामान्य माणुस इतिहास जमा " अशी बातमी एेकायला मिळाली तर यात काही नवल नसेल.         

No comments:

Post a Comment