
हार्मोनियम हे तसे परदेशी वाद्य. पण ते आता भारतीयच वाद्य वाटते. हार्मोनियमचे प्रकार अनेक आहेत. हार्मोनियम भारतात प्रथम आली ती पायपेटीच्या स्वरूपात. त्यानंतर याच पायपेटीचे हातपेटीत रूपांतर केले गेले. याच हातपेटीचे फोल्डींग, पोर्टेबल, स्केलचेंज इत्यादी सुटसुटीत व उपयुक्त प्रकार प्रचारात आले. बाह्य स्वरूप जरी वेगळे असले तरी या साऱ्या प्रकारातील रचनेचे तत्व एकच आहे. हार्मोनियममधून येणारा प्रत्येक स्वर हा एक धातूची पट्टी (रीड), तिच्यावरून जाणाऱ्या हवेमुळे आंदोलित होऊन निर्माण होतो. या स्वराची कंपन संख्या मुख्यत: ते रीड कोणत्या धातूचे आहे त्यावर आणि त्या रीडच्या लांबी, रूंदी, जाडीवर अवलंबून असते. शिवाय ही कंपनसंख्या ते रीड कोणत्या प्रकारच्या साऊंड बॉक्समध्ये बसविले आहे त्यावर थोडयाफार प्रमाणात अवलंबून असते. एखाद्या स्वरासाठी कारखान्यात तयार केलेली रीडस् तंतोतंत एकाच कंपनसंख्येत बोलणारी नसतात. रीडस् हार्मोनियममध्ये बसविल्यावर टयून करावी लागतात. जर्मन आणि पॅरिस रीडस् टिकाऊपणाच्या दृष्टीने चांगली समजली जातात. खर्ज-नर, नर-नर, नर-मादी, खर्ज-नर-नर, खर्ज-नर-मादी अशा अनेक प्रकारच्या हार्मोनियम असतात.
रीडस् ला जी हवा पुरविली जाते ती दोन भात्यांचा उपयोग करून. त्यातील एक आपण
बाहेरून पाहतो तो आणि एक हार्मोनियमच्या तळात, आतील बाजूस आडवा बसविलेला असतो.
बाहेरचा भाता जेव्हा हवा आत भरतो तेव्हा आतील भाता हवा साठवून ठेवण्याचे काम करतो
आणि बाहेरचा भाता जेव्हा हवा भरण्याचे काम करीत नसतो, तेव्हा आतील भाता रीड्सना
हवा पुरविण्याचे काम करतो.
स्केल चेंज हार्मोनियम हा
प्रकार अलीकडे खूपच लोकप्रिय झाला आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट पट्टीत वाजवायची
सवय असेल, तर या हार्मोनियमचा उपयोग होतो. सबंध की बोर्ड आपल्या सोयीप्रमाणे हलवता
येतो. गायक कोणत्याही पट्टीत गात असला तरी की बोर्ड हलवून आपल्या सरावाच्या पट्टीत
वाजवायची सोय, या प्रकारच्या हार्मोनियममध्ये असते. याशिवाय फोल्डिंग व पोर्टेबल अशा
या पेटया घडी करून प्रवासाला नेण्यास अत्यंत सोयीच्या असतात.
No comments:
Post a Comment