Sunday, 26 April 2015

मी आणी माझे बाबा

घराला जसे आई मुळे घरपण असते तसे आई नसेल तर घराला काही अर्थ नसतो. त्याचप्रमाणे घरामध्ये बाबांचे असणे सुध्दा गरजेचे असते. प्रत्येकाला आई ही जवळची असते कारण आई ही प्रेमळ असते. ती जेवढी रागावते त्याच्या कितीतरी जास्त ती अापल्यावर प्रेम करते. बाबा पण प्रेम करतात पण फक्त बाबांचे प्रेम हे अबोल असते, त्यांना त्यांचे प्रेम व्यक्त करता येत नाही, मग सगळ्यांना असे का वाटते की बाबा हे वाइट असतात ते ओरडतात, चिडतात, रागवतात याचे खरे कारण आई ही ओरडली तरी चांगली असते कारण त्यात तीची प्रेमळ माया असते परंतु बाबांना थोडा वाईटपणा हा घ्यावाच लागतो. अाणि आपण बाबांना गृहित धरतो. बाबा बोलायला, ऐकायला, बघायला, रागवायलाच असतात का‌? खरच आपल्याला बाबा काय हे कळले अाहे का? तेव्हा उत्तर नाही असे आले. मग मी विचार केला की माझे बाबा कसे आहे यावर लिहावे. बाबा हा विषय मुळात माझ्यासाठी खूपच भावुक आहे. आई वरती तर सगळेच लिहतात, बोलतात, प्रेम करतात पण तरी बाबांशी असलेल नात खूपच वेगळे आहे. त्याच बाबांवरच्या प्रेमाने एक गोष्ट कळली की बाबा हे सुध्दा प्रेमळ असतात.




 कै. रत्नाकर पुरूषोत्तम चासकर
माझे बाबा कै. रत्नाकर पुरूषोत्तम चासकर. माझे बाबा पत्रकार होते. बाबा कसे असतात, कसे असावे हे मला माझ्या बाबांना बघितल की कळते.बाबांची इच्छ्शक्ती प्रबळ होती. एखादी अशक्य गोष्ट सुध्दा ते अगदी सहजपणे शक्य करायचे.माझे बाबा खुपच साधे होते. बाबा ऑर्डनन्स मध्ये नोकरी करत होते. त्यांना स्वस्थ बसणे माहीत नव्हते. पगार कमी म्हणुन दिवसभर नोकरी करून आल्यावर आपल्या परिवाराला जास्तीत जास्त सुख-समाधान मिळावे म्हणून थोड्यावेळ आराम करून ते रिक्षा चालवायचे.हे सर्व करताना त्यांना कमीपणा वाटत नव्हता,त्यावेळी कल्याणमध्ये गँरेज नव्हते म्हणून डोंबिवलीला जावे लागायचे. तिथे खुप वेळ जायचा. मग बाबांच्या मनात विचार आला आपण स्वताचे गँरेज काढावे. हे सर्व करताना आर्थिक परिस्थती बेताची असल्यामुळे एकट्यानी सर्व करणे शक्य नव्हते.त्यामुळे त्यांनी मोठ्या भावाची व मित्रांच्या मदतीने स्वताचे गँरेज सुरू केले.गँरेज सुरु झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी पुर्ण वेळ देता येत नव्हता व आर्थिक मिळकत जास्त मिळत असल्याने त्यांनी नोकरी सोडली. बाबांची समाजसेवा करण्याची इच्छा खुप होती त्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यात ते सच्चा व कट्टर शिवसैनिक म्हणुन त्यांची ओळख होती. समाजासाठी आपल्याकडून काहीतरी चांगले काम व्हावे व कोणावर अन्याय होऊ नये म्हणुन त्यानी पत्रकारीतेचा अभ्यास घेतला.कट्टर शिवसैनिक आणि निर्भय पत्रकारीता यामुळे त्यांना समाजात खुप मान मिळाला, त्यांना समाजात मिळालेला आदर सन्मान पाहून व त्यांच्या अंगी असलेली जिद्द अाणि अाम्हाला सुखी ठेवण्याचा असलेला प्रयत्न त्यामुळे माझ्या मनात त्यांच्या बद्दल आणखीनच आदर निर्माण झाला.
               मी खुप लहान होते तेव्हापासून मी माझ्या बाबांच्या प्रेमाने बांधली गेली होती. माझ्यासाठी माझे बाबा म्हणजे माझे संपुर्ण जग होते. मी आजारी पडले तर माझे बाबा खुप अस्वस्थ व्हायचे. हे मला लहानपणी जाणवले.  मला आठवते मी साधारणपणे दुसरीला असेल सकाळची शाऴा होती त्यावेऴी मी गणिताची वही नेली नव्हती म्हणून तेव्हा सरांनी 100 उठाबशा काढायला सांगितल्या होत्या आणि त्या काढल्यानंतर माझ्या पायात गोऴे आले होते मला चालायला येत नव्हते तेव्हा माझ्या बाबांनी सरांना खुप बोलले होते. बाबांनी पेपरमध्ये देईल असे सांगितल्यावर सर फार घाबरले होते. या सगऴ्यात एकच कळले माझा त्रास माझ्या बाबांना सहन होत नव्हता. माझ्या रडण्यांनी विव्हऴण्यांनी माझे बाबा खुपच अस्वस्थ झालेले. यावरून बाबांच प्रेम कळलं. माझे बाबा खुप कडक शिस्तीचे होते ही कडक शिस्त ठेवताना त्यांना तसे वागताना आनंद होत नव्हता पण आमच्यावर अडचणी येऊ नये, तसेच वाईट गोष्टी आमच्यापर्यंत पोहचू नये म्हणून बाबा तसे वागायचे हे हळुहऴु कळायला लागले. बाबा म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपल्या मुलांना सुखी पाहण्यासाठी स्वताच्या इच्छांचा कधीच विचार करत नाही. कधी कधी खुप वाईट वाटायचे जेव्हा माझ्या मैत्रिणीचे बाबा त्यांचा परिवाराबरोबर सहलीला सगळ्यांना घेऊन जायचे तेव्हा मला पण वाटायचे माझ्या बाबांनी आम्हाला पण घेऊन जावे पण माझ्या बाबांना ते शक्य नव्हते, कारण माझे बाबा जे काम समाजासाठी करत होते त्यातुन त्यांना खरच आम्हाला वेळ देता येत नव्हता मग काय माझ्या बाबांचे आमच्यावर प्रेम नव्हते असे नव्हते, त्यावेळी त्यांना पण वाटत असेल आम्हालाही वेऴ द्यावा पण परिस्थिती तशी नव्हती की ते आम्हाला कुठे सहलीला घेऊन जातील.
               जेव्हा एखाद्या घरी मुलगा जन्माला येतो तेव्हा सगळ्यांना आनंद होतो कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो, पण जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा सर्वात जास्त आनंद हा बाबांना होतो. आम्ही तीन बहिणी आहोत पण माझ्या दोन्ही बहिणीना आई जवऴची वाटायची त्यांचे आईशी जास्त पटायचे, आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण तरीसुध्दा माझे बाबांवर जास्त प्रेम होते, मी कधीच बाबांपासुन दूर राहिली नाही, मे महिन्याच्या सुट्टीत आजीकडे मामाकडे जाताना मला बाबांना सोडुन जाताना खुप रडायला यायचे बाबांना सोडुन काही दिवसांसाठी जायचे असायचे पण मला ते पण शक्य होत नव्हते माझे जग बाबांपासुन सुरू होयचे. मी माझ्या लहानपणापासुन बाबांना कधी आजारी पडलेत आणि झोपलेले कधीच पाहिले नाही, त्यांना कितीही त्रास होत असला तरी ते सतत काम करताना मी बघितले होते, कारण बाबांना आराम करणे झोपून राहणे हे जमतच नव्हते, माझे बाबा हे खुप चांगले स्विमिंग करायचे, माझ्या बाबांचा स्वतावर जास्त विश्वास हाेता, माझ्या बाबांचे मला एक वाक्य नेहमी आठवते बाबा नेहमी बोलायचे आपल नशीब आपण घडवु शकतो, बाबांच्या त्या बोलण्यात इतका आत्मविश्वास असायचा की त्यांच्याकडे बघितले की कऴायचे कोणतीही परिस्थिती असो आपण त्या परिस्थितीतून तितक्याच आत्मविश्वासाने मार्ग काढु शकतो.                 बाबा खरच खुपच प्रेमऴ असतात मुुलगी जन्म घेते तेव्हा त्या बाबांना हेाणा-या आनंदाला कुठलीच सीमा नसते मुलीच्या येण्यानी बाबांच पुर्ण विश्व व्यापलेल असते सर्वात जास्त बाबांची धडपड चालु असते ती आपल्या मुलीचे हट्ट पुर्ण करून तिला कशाप्रकारे खुश सुखी बघता येईल. बाबांचे प्रेम हे अबोल असते. आपल्या मुलीच्या भल्यासाठी सुखासाठी बाबा जे त्रास सहन करत असतात त्या बाबांच्या प्रेमासाठी मुलीनी आणि मुलांनी सुध्दा त्यांना समजून घ्यायला हवे. एखादी मुलगी जेव्हा एखाद्या मुलावर प्रेम करते हे आई बाबांना सांगु शकत नाही ही त्या आई बाबांसाठी दुखांची  गोष्ट असते जसा विश्वास आई बाबांना आपल्या मुलांवर असतो तसा विश्वास मुलांना आई बाबांबद्दल का नसतो या गोष्टीचा मी नेहमी विचार करायचे, एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमासाठी पळुन गेली हे इतर लोकांच्या बोलण्यात आले तर त्या बापाच्या आणि आईच्या जीवाला किती वेदना होत असतील याचा विचार प्रत्येक मुलीनी करावा असे मला वाटते कारण प्रेम तर आपले आई बाबा सर्वात जास्त आपल्या मुलांवर करत असतात मग एखाद्या मुलाच्या दीड दोन वर्षाच्या प्रेमापुढे त्या मुलीला आई बाबांचे पंचवीस ते तीस वर्षाचे प्रेम का कळत नाही ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमासाठी आई बाबांचा विचार न करता पळून जाते तेव्हा त्या आई बाबांनी त्याच दुख कोणाला सांगायचे त्याच मन कोणाकडे मोकळे करायचे आणि जी परिस्थिती निर्माण होते त्याच खापर बाबांवर फोडले जाते.                                                                                           या सर्व गोष्टी खुपच दुख देणा-या असतात बाबांसाठी एकीकडे मुलीवर जिवापाड प्रेम करतात म्हणून वाईटपणा येऊन सुध्दा तेवढ्याच मोठ्या मनाने मुलीच्या चुका पोटात घेऊन तिला माफ करतात ते बाबाच असतात. बाबांच्या प्रेमाची खरी कसर असते ती लहानपणापासुन ज्या मुलीचे हट्ट पूर्ण केले जिला लाडात वाढवली तिची लग्न करून तिची पाठवणी करताना खुपच वेदना होतात बाबांना मी पण माझ्या बाबांना त्या वेदना अनुभवताना बघितल आहे खुप स्वताला बाबांंनी सांभाळले होते पण मला स्वतापासून दूर करताना खुप वेदना त्यांना झाल्या होत्या.कारण मुलीच्या बाबतीत सर्वच बाबा हे मनाने हळवे होतात आपली मुलगी खुप सुखी होऊन तिच आयुष्य तिला जगता यावे एवढी साधी इच्छा ही बाबांची असते. जेव्हा मुलीचे लग्न करून देतात तेव्हा तिला कसली कमी पडु नये तिच्यापर्यत कोणत्याही प्रकारची दु:ख, अडचणी येऊ नये तसेच मुलीला कोणी काही बोलु नये म्हणुन सासरच्या व्यक्तीना सतत त्यांनी कसे ही वागले तरीसुध्दा मुलीच्या सुखासाठी सासरच्या व्यक्तीची हात जोडुन माफी मागतात असे करण्याइतपत ते मनाने मोठे असतात. या सर्व गोष्टी मुलाला आणि त्याच्या आई बाबांना का नाही समजत असे अनेक प्रश्न मला पडले पण तेव्हा एक गोष्ट समजली की मुलाला फक्त स्वताच्या आई वडिलांचे मन कळते कारण मुलीच्या आई वडिलांचे मन कळण्यासाठी त्यांना समजुन घेण्याची मानसिकता मुलाची कधीच नसते.
                 एखाद्या वेळेस मुलीने सर्वांना समजुन घेणे हे तिचे कर्तव्य आहे असे सांगितले जाते या सर्व पुर्वापार चालत आलेल्या रूढी आहेत मग या रूढी परंपरा मुलांना का लागू होत नाही. एखादी मुलगी लग्न करून येते तेव्हा ती पुर्णपणे नव-यावर अवलंबून असते, पण आज सुध्दा 21व्या शतकात मुलीला त्रास सहन करावा लागतो तिच्या आई बाबांना मानसिक त्रास सहन करावा लागतो तेव्हा खुप वाईट वाटते.मी माझ्या बाबांना झालेल्या मानसिक त्रासाचा विचारच कधी करू नाही शकले. माझ्या बाबांनी होणा-या वेदना स्वताच्या मनात ठेवल्या त्यांनी कोणाला कधी जाणवु सुध्दा दिले नाही.माझ्या मते आई बाबा ही देवाने प्रत्येकाला दिलेली मौल्यवान देणगी व एक सुंदर भेट आहे मग मला माझ्या आई बाबांना झालेला त्रास कसा सहन होईल. मी खुप भाग्यवान आहे की मला रत्नाकर चासकर आणि उमा रत्नाकर चासकर यांच्यासारखे आई बाबा मिळाले याबद्दल मी देवाचे खरच मनापासून आभार मानते, आणि मिळणारा प्रत्येक जन्म मी त्यांची मुलगी म्हणून जन्म घ्यावा अशीच इच्छा देवाकडे व्यक्त करते.    
                  मुलीचे लग्न ही त्या मुलीसाठी आणि तिच्या आई-बाबांसाठी आनंदाची गोष्ट असते पण मला आणि माझ्या आई-बाबांना या एका लग्नानी खुप मानसीक त्रास झाला. मुलीच्या भावी आयुष्याबद्लची त्यांची सर्व स्वप्ने मोडीत निघाली. माझ्या बाबांनी तर मुलीचे बाबा म्हणुन जेवढे माझ्या सुखासाठी करायला पाहिजे होते त्या सर्व गोष्टी त्यांनी केला माझे लग्न स्वखर्चाने केले तसे बघायला गेले तर आमच्यात हुंडा घेत नाही दोन्ही कडचे अर्धा खर्च वाटुन घेऊन लग्न करतात कारण फक्त एकाला त्याचा त्रास होऊ नये ह्यासाठी आमच्याकडे माझ्या दादाचे आणि ताईचे लग्न सुध्दा तसेच झाले होते पण माझ्या बाबतीत तसे झाले नाही. लग्न हे स्वखर्चाने करुन व वरतुन अधिक पैसे देऊन लग्न लावले. आणि काही कारणास्तव घरात भांडणे होऊ लागली. व नंतर आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली.  या गोष्टीचा बाबाना खुप त्रास झाला मुलीचो लग्न ही त्या मुलीला आणि तिच्या आई बाबांना खुप आनंद देणारी गोष्ट असते पण ह्या एका लग्नानी माझे पुर्ण आयुष्यच बदलुन टाकले. मला खुप वेदना आणि त्रास झाला माझ्या बाबांना जेव्हा माझ्यासाठी कोर्टात जावे लागले तेव्हा कारण सामाजिक कार्य करताना एक पत्रकार म्हणून काम करताना माझ्या बाबांनी अनेकांचे संसार वाचवले होते पण माझ्यासाठी माझ्या बाबांना कोर्टात जावे लागले हे माझे आणि माझ्या बाबांचे खरच दुदैव होते. माझे घटस्पोटासाठी पिटिशन दाखल करताना सुध्दा माझे बाबांच कोर्टात आले होते तेव्हा तिथे आलेल्य  वकिलांचे आणि जर्ज साहेबांचे शब्द ऐकून खुपच वाईट वाटले,ते सर्व बाबांना बोलले की चासकर साहेब तुम्ही इथे काय करताय तेव्हा बाबा बोलले मुलीच्या डिवोर्ससाठी आलोय तेव्हा मला सर्वानी सांगितले की बेटा जे झाले त्याचा विचार करून टेन्शन नको घेऊ सगळे ठीक होईल, बाबांना बोलले कोर्ट तुमच्या घरी येत तुमच्या कोर्टात योग्य निर्णय होतो आणि मुलीला पण योग्य न्याय मिळवून द्याल यात शंका नाही हे सर्व ऐकुन माझ्या डोळ्यात पाणी आले होते. तेव्हा बाबांनी डोक्यावर हात ठेऊन सांगितले घाबरू नको मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या प्रत्येक दु:खात मी तुझ्या पीठीशी आहे तेव्हा एकच कळले की छोटी संकंटाना आई चालते पण आयुष्यात सगळ्यात येणारी मोठी वादळे स्विकारताना बाबांचा मोठा आधार वाटतो. 
                 मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बाबांचे शब्द आणि त्यांनी दिलेला विश्वास नेहमी ते माझ्यासोबत असल्याची जाणीव करून देत राहिले. या सर्व गोष्टी घडत असताना साधारणपणे दोन महिन्यात माझे बाबा हे जग सोडून गेले तेव्हा माझा आयुष्य जणु थांबल्यासारखे झाले होते मला एकीकडे समजत होते मला जबाबदा-या पुर्ण करायच्या आहेत बाबांनंतर मला घर सांभाळायचे पण दुसरीकडे बाबांचे अचानकपणे जाणे मला खुपच एकटे करून गेले होते. कुठेही गेले तरी सतत बाबांचे कुठे आहे,जेवलीस का,आफिसला जातान  ट्रेन मिळाली की नाही हे सर्व विचारणारा आवाज याची सवय झाली होती. घरी आल्यावर माझी मस्करी करणे, मला चिडवणे या सर्व गोष्टी हळुहळु बंद होऊन बाबा दिसेनासे झाले.                                                                          आज मुलगी म्हणुन एक कळते की बाबांशिवाय घर कधी पुर्ण होऊ शकत नाही आणि बाबांचे असणे म्हणजे तुमच्याकडे किंवा घराकडे कोणी वाईट नजरेने पाहु शकत नाही. बाबाचे असणे हेच प्रत्येकाच्या आयुष्याला अर्थपुर्ण बनवत असते. घराचा कर्ता असणे खुपच महत्तवाचे असते  आज मी माझे बाबा कसे होते हे सांगितले कारण त्याच्यामुळे आज मी आहे. बाबांचा वारसा चालवण्याच्या इच्छेने मी पण पत्रकारीता करण्याचा प्रयत्न करत आहे. असे थोर आई बाबा मिळायला भाग्य लागते. म्हणुन माझी सर्वान मनापासुन नम्र विनंती आहे  कधीच आई बाबांना दु:खवु नका.

No comments:

Post a Comment