Saturday, 25 April 2015

जोडीदाराची निवड...

यात आली पोर...बापाच्या जीवाला घोर’…अशी आपल्याकडे म्हण आहे. किंवा होती म्हणू या. उपवर मुलीचा म्हणजे ज्याच्याकडे दयाबुध्दीनं कीव करून पाहावं, अशी व्यक्ती असायची. मुलीसाठी स्थळं शोधता शोधता अशा पित्यांच्या चपलांच्या टाचा झिजणार, हे अगदी निश्चित असायचं. एकदा मुलगी उजवली की, झालं,हा दृष्टीकोन असायचा आणि त्यातूनच खरं तर  पुढच्या साऱ्या समस्या उभ्या राहायच्या. आज मात्र परिस्थिती पुष्कळच बदलली आहे. 
मुली आता मुलांच्या बरोबरीने शिकताहेत. करिअर करताहेत उच्च शिक्षणासाठी परदेशी जाताहेत. त्या स्वत:ला मुलांपेक्षा दुय्यम मानायला नकार देताहेत. आर्थिक स्वावलंबनानं त्यांना नवं बळ आलेलं आहे. याखेरीजही एकूणच जीवनशैली बदलते आहे. जग जवळ येत चाललं आहे. जीवनाची क्षितिजं रूंदावत आहेत. जीवनाची गती वाढली आहे. जीवनमूल्यं बदलत आहेत.
पण एकीकडे असं सगळं वातावरण बदलत असताना काही बाबतींत मात्र आजही आपली मानसिकता आपलं जुनाट वळण सोडत नाहीय. वर्षानुवर्षं समाजात रूजलेल्या काही कल्पनांचा, रीती-नीतींचा पगडा आजही टिकून आहे. राहणीमानात आधुनिकता आली असली, तरी काही जुनाट परंपरा विशेषत: सोयीस्करपरंपरा आजही सोडवत नाहीत. याखेरीजही जीवनातील वाढते ताण-तणाव, असुरक्षितता, अस्वस्थता या साऱ्यांचे पडसाद जोडीदाराची निवड करत असताना उमटत असल्यानं अनेक आव्हानं समोर उभी राहिली आहेत. पण कदाचित म्हणूनच अशा सर्व ताण-तणावांवर उतारा ठरू शकणाऱ्या आणि स्त्री-पुरूष दोघांनाही स्वास्थ, समाधान देऊ शकणाऱ्या सुंदर, सशक्त अशा सहजीवनाची आज अधिक निकड निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment